राज्यात आलिशान घरांची मागणी घटली; नोकरीतील अस्थिरता, मंदीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 02:22 AM2018-10-07T02:22:59+5:302018-10-07T02:23:55+5:30
नोटाबंदीचा झालेला परिणाम आणि रेरा कायद्यातील काही तरतुदी यामुळे राज्यातील एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या आलिशान घरांची मागणी प्रचंड प्रमाणात घटली आहे.
पुणे : नोटाबंदीचा झालेला परिणाम आणि रेरा कायद्यातील काही तरतुदी यामुळे राज्यातील एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या आलिशान घरांची मागणी प्रचंड प्रमाणात घटली आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला १५ ते ७० लाखांच्या फ्लॅटना मागणी वाढल्याने त्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था आली आहे.
काही वर्षापासून बांधकाम उद्योगात मंदीचे वातावरण होते. यातून हे क्षेत्र सावरत असले तरी आलिशान घरांचे प्रकल्प सुरू करणारे व्यावसायिक मात्र प्रचंड अडचणीत आले आहेत. आलिशन फ्लॅट विकलचे जात नसल्याचे चित्र आहे. नोकरीतील अस्थिरता. मंदीमुळे नोकरी टिकते का, हा प्रश्न निर्माण झाल्याने गोल्फ कोर्स किंवा व्हिला सध्या नकोच, त्यापेक्षा लहान फ्लॅट घेण्याची मानसिकता वाढत आहे.
आयटी अभियंता असलेले चिराग कुलकर्णी दोन वर्षांपासून घर घेण्याचे ठरवीत आहेत. पती-पत्नी दोघेही कमावते असल्याने त्यांना एक कोटींचा फ्लॅट ते पाहत होते. परंतु, आयटी क्षेत्रातील मंदीमुळे अनेकांच्या नोकºया जात आहेत. त्यामुळे ५० ते ६० लाखांपर्यंतचा फ्लॅट ते पाहत आहेत.
प्राध्यापक असलेल्या संजय कुरकुंडे यांची पत्नी एका बहुराष्टÑीय कंपनीत कायदेविषयक सल्लागार आहे. त्यांनी एका नामांकित गृहप्रकल्पामधील फ्लॅटचा सौदा जवळपास पूर्ण केला होता. परंतु, व्याजदरात होत असलेली वाढ आणि पत्नीच्या नोकरीची नसलेली शाश्वती यामुळे आता दोन बेडरुमचेच घर घेण्याचे त्यांनी ठरविले आहे.
दिवाळीत मध्यमवर्गासाठी सात हजार घरे
पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नवरात्र ते दिवाळी या महिनाभराच्या कालावधीत नवीन सात हजार घरांचे प्रकल्प सादर होत आहेत. त्यातील तब्बल ६० टक्के घरे ही ३० लाखांच्या आतील असतील. उर्वरीत घरांच्या किंमती ३० ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. तसेच परवडणाºया श्रेणातील अडीच ते तीन हजार घरे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आलिशान या सदरात मोडणारी १ कोटी आणि त्या पुढील रक्कमेच्या घरांना जवळपास खरेदीदार नाही.