लातुरात मराठा बांधवांचा महाविक्रमी मूकमोर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2016 05:56 PM2016-09-19T17:56:45+5:302016-09-19T17:57:01+5:30

मराठा क्रांती मूकमोर्चाला मिळालेल्या अभुतपूर्व प्रतिसादामुळे सोमवारी अवघे शहर मराठामय झाले होते. लक्षावधी मराठा बांधवांचा जनसागरच उसळला होता.

Demand of Maratha brothers in Latur! | लातुरात मराठा बांधवांचा महाविक्रमी मूकमोर्चा !

लातुरात मराठा बांधवांचा महाविक्रमी मूकमोर्चा !

Next

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १९ : मराठा क्रांती मूकमोर्चाला मिळालेल्या अभुतपूर्व प्रतिसादामुळे सोमवारी अवघे शहर मराठामय झाले होते. लक्षावधी मराठा बांधवांचा जनसागरच उसळला होता. शहरातील सर्व रस्त्यांवर दूर दूरवर दृष्टी जाईल तिकडे हातातील भगवे झेंडे आणि समाजाच्या मागण्यांचे फलक घेऊन फक्त मराठा बांधवच चालताना दिसत होते. ह्यमी मराठाह्ण अक्षराने गोंदलेली डोक्यावरची गांधी टोेपी,  एक मराठा ! लाख मराठा!! अशा मजकुराचे लाखो टी शर्ट, आणि फाशी द्या.. फाशी द्या ! कोपर्डीतील आरोपीला फाशी द्या , करण्या वाघाचे रक्षण ! द्या आरक्षण!! एकच नारा ! करा सातबारा कोरा !! अशा फलकांसह चालणाऱ्या समाजबांधवांनी लातूर गजबजून गेले होते. समाजबांधवांच्या विराट उपस्थितीने हा मोर्चा जणू जिल्ह्याच्या इतिहासातील महाविक्रमी महामोर्चा झाला़

नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेधासाठी राज्यभर निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चांनी अवघ्या राज्याचे लक्ष वेधले आहे. प्रत्येक मोर्चा समाज बांधवांच्या विक्रमी सहभागामुळे अचंबित करतो आहे. लातूरच्या मोर्चानेही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले. सकाळी ११:४० ला जिल्हा क्रीडा संकुलात जिजाऊ वंदनेने महामोर्चाला प्रारंभ झाला. काळ्या फिती दंडाला बांधून, विविध फलक हातात घेऊन अतिशय शांततेत मूकमोर्चा निघाला.

अनेक मोर्चेकऱ्यांनी परिधान केलेले काळा पोशाख लक्ष वेधून घेत होता. मजल दरमजल करीत पाच ते सहा किलोमीटरची पायपीट संपवून जेव्हा महामोर्चा बार्शी रोडवरील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तेव्हा त्याचे शेवटचे टोक मोर्चा सुरु झालेल्या शिवाजी चौकातच स्थिरावले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे भलेमोठे मैदान महिलांनीच पूर्ण भरले होते. महिलांना उभे रहायलाही जागा नव्हती. त्यामुळे उरलेल्या महिलांना रस्त्यावरच थांबावे लागले. तर तिथून पुढे पाच किलोमीटरवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला समाजबांधव जागा मिळेल तिथे ठिय्या मांडून होते.

जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना पाच मुलींनी मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची राष्ट्रगीताने सांगता झाली. लाखोंच्या सहभागामुळे लातूर जिल्ह्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मोर्चा म्हणूनच याची नोंद झाली. लाखोंच्या संख्येने गर्दी होऊनही कमालीच्या शिस्तीने आणि कार्यकर्त्यांच्या स्वच्छता मोहिमेमुळे मोर्चा अधिक लक्षवेधक ठरला.

विक्रमी गर्दी
लातूरच्या मोर्चाला समाजबांधवांची विक्रमी गर्दी होती. संयोजकांनी १७ लाखांहून अधिक बांधव मोर्चात सहभागी झाल्याचा दावा केला. या मोर्चात अनेक माजी खासदार, माजी आमदार, आमदार, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी नोकरदार, उद्योजक आणि शेतकरी बांधव आणि विशेष म्हणजे महिलांचा सहभागही लक्षणिय होता. सर्व पक्ष, संघटना, सर्व गट, तट विसरुन लाखो बांधव सहभागी झालेल्या या मोर्चाचे नेतृत्वही युवती आणि महिलांनी केले. राजकीय नेते मोर्चात सर्वात शेवटी होते, हे विशेष.



श्रध्दांजलीसाठी लक्षावधी लोक झाले स्तब्ध !
मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर सुरुवातीला संयोजकांच्या वतीने कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी आणि उरी (जम्मू काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ही श्रध्दांजली अर्पण करते वेळी लाखोंचा हा जनसागर एकदम स्तब्ध झाला.

मागण्या वाचताच् टाळ्यांचा गजर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मंचावरुन पाच शालेय मुलींनी मराठा समाजाच्या मागण्यांचे वाचन केले. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर पाहता हा कायदा रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एका मुलाला सरकारी नोकरी द्या, शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनेप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा गृहीत धरुन शेतीमालाला हमीभाव द्या, मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीसाठी उत्पन्नमर्यादा एक लाखावरुन सहा लाख करा, लातूर-बीदर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील मराठी भागाला महाराष्ट्रात घ्या अशा प्रमुख मागण्या होत्या. या मागण्यांच्या वाचनावेळी लाखो बांधवांनी टाळ्यांचा गजर करुन आपला पाठिंबा व्यक्त केला.

Web Title: Demand of Maratha brothers in Latur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.