फौजी शिवतर करण्याची मागणी
By Admin | Published: October 22, 2014 10:20 PM2014-10-22T22:20:48+5:302014-10-22T23:16:37+5:30
शिवतर गाव : सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष ठरणार
श्रीकांत चाळके - खेड -पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात धारातीर्थी पडलेल्या शिवतर येथील २३४ जवानांच्या स्मरणार्थ इंग्रज सरकारने उभारलेल्या रणस्तंभाची डागडुजी झाली आहे़ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या निधीतून १५ लाख रूपये या कामासाठी दिले आहेत. याकरिता रामदास कदम यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आतापर्यंतच्या सर्व आमदारांनी तसेच लोकप्रतिनिधींनी आणि समाजोपयोगी कामाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले होते. मात्र, रामदास कदम यांनीच विशेष लक्ष घालून दिवंगत सैनिकांच्या अतुल शौर्याला सलाम करीत मातृभूमीप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल येथील जवान कृतार्थ झाले आहेत़ आता सुशोभिकरणाबरोबरच कदम यांनी दुर्लक्षित राहिलेल्या शिवतर गावचे ‘फौजी शिवतर’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी येथील जवानांनी केली आहे़
ब्रिटिशांच्या काळात याच गावातील शेकडो जवानांनी आपल्या मातृभूमीप्रती बलिदान केले आहे. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बलिदान दिलेल्या जवानांचे हे एकमेव गाव आहे. मात्र, या बदल्यात या गावामध्ये माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या पाल्यांसाठी कोणतीही विकासकामे येथे झालेली नाहीत. त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण व्हावी, याकरिता शिवतर कोंडवाडी येथे बिटिश सरकारने उभारलेल्या रणस्तंभावर २३४ पैकी केवळ १८ जवानांची नावे आहेत. उर्वरित जवानांची माहिती येथील माजी सैनिकांना तसेच हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या पाल्यांना तसेच माजी सैनिकांना नाही. येथील माजी सैनिकांच्या संघटनेने मागणी करूनही ती नावे प्राप्त झाली नाहीत. गेल्या तेरा वर्षांपासून याकरिता संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यात येत आहेत. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. अनेक वर्षे झालेल्या या रणस्तंभाची दुर्दशा झाली होती. अखेर रामदास कदम यांनी पुढाकार घेऊन या स्तंभाची डागडुजी केली आहे. त्याकाळी २१ रूपये पगारावर काम करणारे आणि ब्रिटिश सरकारमध्ये चाकरी करूनही मातृभूमीशी कोणतीही तडजोड न करणारे लाडकोजीराव मोरे आजही शिवतर गावात देशाची शान बनून राहिले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात अनेक कुटुबं उद्ध्वस्त झालेल्या शिवतर गावाचा ‘मर्दुमकी गाजवणाऱ्या सैनिकांचा गाव’ म्हणून भारत सरकारकडून गौरव करण्यात आला. हेच गाव आज विशेष सुविधांपासून अद्याप वंचित आहे.़ राजकीयदृष्ट्या सर्वच पक्षांकडून या गावाला सातत्याने कमी महत्व दिले गेले़ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबवडे गावचे नुकतेच ‘फौजी आंबवडे’ असे नामकरण करावे.
आंबवडे गावाप्रमाणे भारत सरकारकडून शिवतर गावालाही माजी सैनिकांसाठी द्यावयाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. सैनिकी गावाचा विकास खऱ्या अर्थाने त्याचवेळी होणार आहे. याकरिता रामदास कदम यांनी लक्ष घालावे, अशी मागणी येथील जवांनानी केली आहे.
रणस्तंभाची डागडुजी खासदारांच्या निधीतून.
कदम यांचे प्रयत्न.
दुर्लक्षित शिवतरला फौजी शिवतर करण्यासाठी प्रयत्न.
दिवंगत सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्याची माजी सैनिकांची मागणी.
जवानांचे गाव म्हणून प्रसिध्द.