दलित युवकाच्या हत्येची सीआयडी चौकशी व्हावी कवाडेंची मागणी
By admin | Published: May 5, 2014 08:27 PM2014-05-05T20:27:36+5:302014-05-06T22:07:04+5:30
खर्डा येथे नितीन आगे या दलित युवकाची हत्या ही जातीय विद्वेषातून घडली आहे़ हा शांत डोक्याने केलेला खून असून, याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे..
अहमदनगर : खर्डा येथे नितीन आगे या दलित युवकाची हत्या ही जातीय विद्वेषातून घडली आहे़ हा शांत डोक्याने केलेला खून असून, याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी सोमवारी केली़ दरम्यान, राज्य सरकार या घटनेने विषन्न आहे़ आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी योग्य ती पावले उचलू असे आश्वासित करुन काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला पक्षाकडून पाच लाखांची मदत जाहीर केली़
पीडित आगे कुटुंबाच्या सांत्वनासाठी सोमवारी सलग आठव्या दिवशी अनेक नेत्यांनी खर्डा गाठले़ दुपारी २ च्या सुमारास कवाडे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळाला भेट देऊन आगे कुटुंबाचे सांत्वन केले़ त्यानंतर ४ वाजेच्या सुमारास माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनीही आगे कुटुंबीयांची भेट घेतली़ यावेळी कुटुंबाशी बोलताना ठाकरे म्हणाले, ही घटना पुरोगामी राज्यासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे़ या घटनेने राज्याचे सामाजिक वातावरण बदलण्याची गरज अधोरेखित केली आहे़ पक्ष व सरकार पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे़ काँगे्रस पक्षाकडून पीडितांना पाच लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली़ यावेळी मयत नितीनचे वडिल राजू आगे यांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली़ राजू आगे म्हणाले, या गावाऐवजी अन्य गावात पुनर्वसन करावे़ त्यानुसार जामखेड येथे या कुटुंबासाठी जागा शोधून पुनर्वसनासाठी सरकार पातळीवर पावले उचलली जातील, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले़ दरम्यान, ठाकरे, थोरात पोहोचले त्याचवेळी शिवसेनेच्या उपनेत्या डॉ़ निलम गोर्हे यांनी आगे कुटुंबियांची भेट घेऊन महसूल मंत्र्यांवर टीका केली़ दरम्यान, ज्या परिसरात ही घटना घडली त्या खर्डा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)