विधानपरिषदेत मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 02:23 AM2020-10-05T02:23:04+5:302020-10-05T02:24:19+5:30
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मातंग समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप आगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
मुंबई : मातंग समाजाला विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त प्रतिनिधित्व मिळावे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे महामंडळाला कर्ज वितरणासाठी एक हजार कोटींचा निधी द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मातंग समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप आगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
राज्यात सव्वाकोटी मातंग समाज आहे. मात्र, आतापर्यंत समाजालाचा विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्व मिळाले नाही.
दिलीप आगळे यांच्या माध्यमातून नामनिर्देशित सदस्यत्व मिळावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावेळी आगळे यांच्यासह अभिमान मस्के, अशोक शिंदे, खरात, के.एम.हनवते आदी मान्यवर उपस्थित होते.
आण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य
साधत मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळावा, तसेच बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी संशोधन केंद्र स्थापन करावे, सामाजिक न्याय विभागात मातंग समाजास लोकसंख्येच्या निकषानुसार विकासात्मक योजनांचा लाभ मिळावा. आण्णाभाऊ साठे आणि क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारक उभारण्यात यावे अशा मागण्याही करण्यात आल्या.