सबनीसांची डी.लिट.ची मागणी फेटाळली
By admin | Published: February 3, 2016 01:42 AM2016-02-03T01:42:19+5:302016-02-03T01:42:19+5:30
एखाद्याला डी.लिट. ही पदवी सन्मानाने दिली जाते... ती द्यावी अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही; मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ही गोष्ट अपवाद ठरवली.
पुणे : एखाद्याला डी.लिट. ही पदवी सन्मानाने दिली जाते... ती द्यावी अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही; मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ही गोष्ट अपवाद ठरवली.
‘कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने ही पदवी मला देण्याबबात विचार करावा,’ अशी विनंती त्यांनी विद्यापीठाला केली; पण विद्यापीठ जुमानत नाही म्हटल्यावर त्यांनी चक्क न्यायालयात धाव घेतली. इथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. डी.लिट. ही पदवी सन्मानाने देण्यात येत असून कायदेशीर अधिकारात ती मागता येत नाही, असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. सबनीस यांची याचिका नुकतीच फेटाळली.
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी २००३मध्ये शिवाजी विद्यापीठाकडे डी.लिट. पदवी मिळण्यासाठी अर्ज केला होता. ‘साहित्य क्षेत्रातील माझे योगदान, पुस्तके, अध्यापन कार्य यांची दखल घेऊन डी.लिट. पदवीसाठी माझा विचार व्हावा,’ असे त्या अर्जात म्हटले होते. याला डॉ. सबनीस यांनीदेखील दुजोरा दिला.
या संदर्भात ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवाजी विद्यापीठाकडे डी.लिट.साठी अर्ज केला होता हे मान्य केले; मात्र सन्माननीय म्हणून नव्हे, तर डी.लिट. पदवी मिळण्यासाठी आपण रीतसर परीक्षा दिली होती. या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिवांकडे वारंवार विचारणा केली. त्यांनी पास किंवा नापास काहीच सांगितले नाही. थोडक्यात, कोणतेच उत्तर मिळाले नाही. मग शेवटी न्यायालयात विद्यापीठाविरोधात याचिका दाखल करावी लागली. जो काही मानसिक त्रास यादरम्यान झाला त्याबाबत नुकसानभरपाई मागितली. मात्र, न्यायालयाने तांत्रिक मुद्द्यावरून याचिका फेटाळली असल्याचे माझ्या वकिलांकडून समजले आहे. निकाल वाचल्यानंतरच कोणत्या कारणावरून ती फेटाळली हे कळू शकेल, असे सबनीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)