वेगळ्या विदर्भाची मागणी ही फक्त चार जिल्ह्यांपुरतीच- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 09:42 PM2018-02-21T21:42:48+5:302018-02-21T21:43:02+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील एक वजनदार नेते शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली.
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील एक वजनदार नेते शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. मुरब्बी पवार आणि रोखठोक राज यांच्यामध्ये मुलाखतीदरम्यान चांगलीच जुगलबंदी रंगली होती. याच मुलाखतीत राज ठाकरेंनी वेगळ्या विदर्भावर पवारांची भूमिका जाणून घेतली.
वसंतराव नाईक, सुधाकराव नाईक, कन्नमवार असे तीन मुख्यमंत्री झाले असतानाही वेगळ्या विदर्भाची मागणी का होते ?, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. त्याला शरद पवारांनीही रोखठोक उत्तर दिलं आहे. विदर्भ हा पूर्वी हिंदी भाषक मध्य प्रदेशचा भाग होता. वेगळ्या विदर्भाची मागणी ही फक्त चार जिल्ह्यांपुरतीच मर्यादित होती. वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचं नेतृत्व हे हिंदी भाषकांकडे गेल्यानंतरच या मागणीनं जोर धरला होता. परंतु सामान्य मराठी माणूस वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. वसंतराव नाईक यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत विदर्भातून इतके मुख्यमंत्री झाले तरी वेगळ्या विदर्भाची मागणी कशी होते या राज यांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, वेगळा विर्भ मागणारा मूलत: मराठी माणूस नाही, अन्य भाषक आहे. वेगळ्या राज्याचे नेतृत्व आपल्याकडे येऊ शकते, असे मानणारे अन्य भाषक वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. सामान्य माणूस मनापासून त्याचा पुरस्कर्ता नाही. ज्या कोणाला वेगळा विदर्भ हवा असेल त्यांनी लोकमताच्या माध्यमातून तो घ्यावा. पण लोकमत घ्यायला ते तयार नाहीत, असंही पवार म्हणाले आहेत.
पवारांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप यांनी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिद्ध हास्यकवी रामदास फुटाणे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. राजकारणातल्या दोन पिढ्यांचा मेळ घालणारी ही मुलाखत ऐकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात हा कार्यक्रम पडला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारामुळे 3 जानेवारीला नियोजित मुलाखतीचा हा कार्यक्रम रद्द केला होता. तो कार्यक्रम आज 21 फेब्रुवारीला पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात पार पडला आहे.