नेवाळी प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापण्याची मागणी
By admin | Published: June 28, 2017 03:23 AM2017-06-28T03:23:59+5:302017-06-28T03:23:59+5:30
नेवाळीच्या शेतजमिनींचा तिढा सोडवण्यासाठी महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळीच्या शेतजमिनींचा तिढा सोडवण्यासाठी महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, या मागणीसाठी भाजपच्या खासदार, आमदार आणि नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही समिती शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊ शकेल, असे सुचवणारे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी गावकऱ्यांच्या प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास विरोध केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी २९ जुलैला बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापूर्वी ही बैठक होईल, असे वाटत असतानाच भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून नवे साकडे घातले.
खासदार कपील पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आणि कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. नेवाळी आंदोलनप्रकरणी मध्यस्थी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधांना दिले. संरक्षणमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.