परदेशातून जहाजाने ऑक्सिजन आणण्याची तयारी, एप्रिलच्या शेवटी मागणी आणखी वाढणार
By अतुल कुलकर्णी | Published: April 17, 2021 04:32 AM2021-04-17T04:32:29+5:302021-04-17T06:46:17+5:30
oxygen : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानातून ऑक्सिजन आणता येतो का, हे पाहिले जाईल, असे सांगितले होते. मात्र, ऑक्सिजन हवेतून आणणे अशक्य आहे.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : महाराष्ट्रात सध्या ५ लाख ७५ हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण आहेत. त्यासाठी रोज १,२७८ मेट्रिक टन ऑक्सिजन लागणार आहे. ही मागणी राज्यात तयार होणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा जास्त आहे. एप्रिलच्या शेवटपर्यंत ही मागणी आणखी वाढेल. त्यामुळे राज्य सरकारने अन्य राज्यांतून रेल्वेच्या साहाय्याने ऑक्सिजन आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासोबतच जहाजाच्या साहाय्याने परदेशातून ऑक्सिजन आणता येतो का? याचीही युद्धपातळीवर चाचपणी सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानातून ऑक्सिजन आणता येतो का, हे पाहिले जाईल, असे सांगितले होते. मात्र, ऑक्सिजन हवेतून आणणे अशक्य आहे. विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर हवेचा दाब कमी होतो. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशी वाहतूक करणे तांत्रिदृष्ट्या शक्य नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आजूबाजूच्या राज्यातून रेल्वेच्या सहाय्याने ऑक्सिजन आणण्याचा पर्याय पुढे आला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर हे करून पाहिले जाईल. त्यासाठीचा खर्च, वेळ आणि किती ऑक्सिजन येतो हे तपासून पुढील निर्णय घेतले जातील, असे जन आरोग्य योजनेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. अशी वाहतूक करण्यासाठी क्रायोजेनिक टँकर लागतात. आपल्याकडे ५० टँकर मिळवण्यात आले आहेत. हे टँकर्स मालवाहतूक रेल्वेच्या सहाय्याने आणले जातील.
केंद्रीय रेल्वेने त्यासाठी मान्यता दिली आहे. शिवाय परदेशातून समुद्रमार्गाने जहाजातून ऑक्सिजन आणता येईल का? कोणत्या देशातून असा ऑक्सिजन मिळेल, त्यासाठीचा खर्च, प्रवासाचा वेळ, याचीही तपासणी सुरू असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. देशात रोज ७ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होतो. महाराष्ट्रात छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन आणण्याचे प्रयत्न प्रायोगिक तत्त्वावर केले जात असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.
अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले, सध्या राज्यात ऑक्सिजन उत्पादकांची एकूण संख्या ३३ आहे. तर रिफिलिंग करणाऱ्यांची संख्या ९१ आहे. राज्यात ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता १३०० मेट्रिक टन असली, तरी दररोज १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होत आहे. वापर वैद्यकीय ऑक्सिजनसाठी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुरवठा आणि मागणी यात मोठा फरक पडत आहे. त्यामुळे भिलाई, बेल्लारी, बोकारो, रौरखेला, दुर्गापूर, हल्दिया, आदी ठिकाणाहून साठा प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३० एप्रिलपर्यंत वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता प्रत्येक दिवशी ३०० ते ५०० मेट्रिक टन अतिरिक्त साठा मिळणे गरजेचे असून तसे नियोजन केले आहे.
- टप्प्याटप्प्याने पुरवठा वाढवून साधारणपणे ४०० मेट्रिक टन प्रतिदिन परराज्यातून पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून हा पुरवठा ३ ते ४ दिवसात सुरु होईल असे नियोजन करण्यात आले आहे.
परराज्यातून येणाऱ्या ऑक्सिजनचे नियोजन
बेल्लारी प्लांट १
२०० मेट्रिक टन
ऑक्सिजन मिळेल.
हा पुरवठा औरंगाबाद विभागात
बेल्लारी प्लांट २
१४६७ मेट्रिक टन
ऑक्सिजन मिळेल.
हा पुरवठा लातूर, उस्मानाबाद येथे
एअर वॉटर बेल्लारी
५१२ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल.
त्यासाठी टँकर आणि पुरवठाचे ठिकाण याचे नियोजन सुरू आहे.
हैदराबाद येथून
१०० मेट्रिक टन
ऑक्सिजन मिळेल.
हा पुरवठा नांदेड, उस्मानाबाद,
लातूर येथे होईल.
भिलाई येथून
२२८९ मेट्रिक टन
ऑक्सिजन मिळेल.
सरासरी १०० मेट्रिक टन
ऑक्सिजन प्रतिदिन मिळेल.