डॉल्बी बंदीमुळे पारंपरिक वाद्यांची मागणी वाढली

By admin | Published: September 22, 2015 01:36 AM2015-09-22T01:36:53+5:302015-09-22T01:36:53+5:30

डॉल्बीवरील बंदीमुळे गणेशोत्सवात बॅन्ड, बँजो, झांजपथक, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग व सनई-चौघडा या पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे.

The demand for traditional vessels increased due to the Dolby ban | डॉल्बी बंदीमुळे पारंपरिक वाद्यांची मागणी वाढली

डॉल्बी बंदीमुळे पारंपरिक वाद्यांची मागणी वाढली

Next

सदानंद औंधे , मिरज
डॉल्बीवरील बंदीमुळे गणेशोत्सवात बॅन्ड, बँजो, झांजपथक, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग व सनई-चौघडा या पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी बॅन्ड, बँजो व झांजपथकांचे दर ४0 ते ५0 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी आहे. न्यायालयाने ध्वनिप्रदूषणावर निर्बंध घालण्यापूर्वी गणेशोत्सवात डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने पारंपरिक वाद्यांवर संक्रांत आली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत पोलीस व प्रशासनाकडून डॉल्बीबंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. नवव्या व अखेरच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बॅन्ड, बँजो, झांजपथक मिळविणे मंडळांना आता अवघड झाले आहे. या वर्षी विसर्जनाच्या अखेरच्या दिवशी मोठ्या मागणीमुळे बॅन्ड, झांजपथकाचे दर ४0 ते ५0 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. काही बँजो व झांजपथके ताशी ७ ते ८ हजार रुपयांची मागणी करीत आहेत.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँजो व झांजपथके आहेत. मिरजेसह कागवाड, सौंदत्ती, चिकोडी, जमखंडी, अथणी येथील बँड पथकांची ख्याती आहे. याशिवाय नाशिक ढोल हा सनईच्या साथीने ढोलवादनाचा प्रकार, ताशाच्या साथीने तुतारीसारखे वाद्य वाजवित वादकांचे नृत्य, हा नवीन प्रकार मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. नाशिक ढोलसाठी सध्या किमान ३0 हजार रुपये दर आहे. लहान मंडळांची धनगरी ढोल, लेझीम, टाळ-मृदंग या स्वस्त वाद्यांना पसंती आहे. मात्र त्यासाठीही १० ते १५ हजार रुपये दर आहे.
पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी असल्याने गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधीच वाद्यपथकांचे बुकिंग झाले आहे. महाराष्ट्रामध्ये डॉल्बीवर बंदी आल्यानंतर कर्नाटकात सीमाभागात डॉल्बीचा वापर सुरू होता. मात्र तेथेही डॉल्बीवर संक्रांत आल्याने डॉल्बीचालक अडचणीत आले आहेत. यामुळे शहराऐवजी ग्रामीण भागात डॉल्बीचा वापर सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर रोखण्यासाठी मिरजेत पोलिसांनी ध्वनी मापन करणारी तीन पथके नियुक्त केली आहेत. नियमांचे उल्लंघन करून डॉल्बीचा वापर केल्यास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व किमान एक लाखाच्या दंडाची तरतूद आहे. डॉल्बीला बंदी असली तरी, बँजोला डॉल्बीचा बेस बसवून बँजोचा आवाज वाढविण्याचे प्रकारही सुरू आहेत. मात्र पोलिसांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने, पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा लागणार आहे.

Web Title: The demand for traditional vessels increased due to the Dolby ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.