तिकिटासाठी भाजपाकडून दोन लाख रुपयांची मागणी!
By admin | Published: February 5, 2017 04:19 AM2017-02-05T04:19:18+5:302017-02-05T04:19:18+5:30
केंद्र व राज्यात सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाने एबी फॉर्म
नाशिक : केंद्र व राज्यात सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाने एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांकडे प्रत्येकी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाल्याने पक्ष अडचणीत आला आहे. भाजपाने
हा पक्षनिधी असल्याची सारवासारव
केली आहे.
पक्षाने प्रथमच उमेदवारी यादी जाहीर न करता, वैयक्तिक पातळीवर त्यांना एबी फॉर्म वाटले, तर काहींना उमेदवारी घेण्यासाठी पक्षाच्या येथील ‘वसंतस्मृती’ कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी पक्षाचे सरचिटणीस नाना शिलेदार यांच्यावर उमेदवारांचे नाव, पत्ता व माहिती घेण्याची व पक्षाने निश्चित केलेल्यांना एबी फॉर्म देण्याची जबाबदारी सोपविली होती.
शिलेदार हे उमेदवारी मागणाऱ्यांकडून दोन लाखांची मागणी करीत असल्याची ध्वनिचित्रफित शनिवारी व्हायरल झाली. शिलेदार यांनी दोन लाखांची मागणी तर केलीच, परंतु पैसे नसतील, तर बाजूला व्हा, कोणाशी बोलायचे ते बोला, असे खडे बोलही इच्छुकाला सुनावल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्या कन्येला पक्षाने उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी अशाच प्रकारचा आरोप पक्ष नेतृत्वावर केला आहे. यामुळे बदनाम झालेल्या भाजपा नेत्यांकडून आता सारवासारव केली जात आहे. सदरचे पैसे पक्षाच्या संबंधित उमेदवारांच्या प्रचारासाठीच खर्च होणार असल्याचे काही जण खासगीत सांगताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)
काय आहे व्हिडीओत..?
भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात एका केबीनमध्ये शहर सरचिटणीस नाना शिलेदार बसले असून, त्यांच्याकडे गेलेल्या इच्छुकाकडे ते दोन लाख रुपयांची मागणी करतात. इतकेच नव्हे, तर या रकमेचा चेक द्या, असेही त्यात सुचविले आहे. एका इच्छुक उमेदवारानेच हा व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचे सांगण्यात येत आहे.
आ. सीमा हिरे
यांचे घूमजाव
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आ. सीमा हिरे यांनी सुरुवातीला वादग्रस्त प्रतिक्रिया देत पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी घूमजाव केले. कदाचित, हे पैसे पार्टी फंड वगैरे असेल, असे त्या म्हणाल्या.
सानप यांचा मोबाइल
स्विच आॅप
वादग्रस्त शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याशी संपर्क साधला असता, सुरुवातीला त्यांनी दहा मिनिटांत फोन करतो, असे सांगितले. नंतर मोबाइल स्विच आॅफ केला होता.
- हा तर पक्षनिधी : देवयानी फरांदे यांची सारवासारव
- आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मात्र, हा पक्षनिधी आहे. निवडणुकीच्या प्रचारसाठी तो वापरला जातो, असे सांगून सारवासारव केली.