बाजीराव व लालबागच्या राजाला यंदा मागणी
By Admin | Published: August 27, 2016 03:24 AM2016-08-27T03:24:39+5:302016-08-27T03:24:39+5:30
या वर्षी बाजीराव आणि लालबागच्या राज्याच्या गणेशमुर्तींना अधिक मागणी असून मूर्तींच्या किंमतीत १५ टक्के वाढ झाली आहे.
वाडा : या वर्षी बाजीराव आणि लालबागच्या राज्याच्या गणेशमुर्तींना अधिक मागणी असून मूर्तींच्या किंमतीत १५ टक्के वाढ झाली आहे. अशी माहिती येथील कुंभार आळीतल्या गणेश आर्ट मूर्तीशाळेचे मूर्तिकार आशिष साळवी यांनी दिली. विशेष म्हणजे त्यांनी जे.जे.मधून शिल्पकलेची पदवी घेतली आहे. मूर्तीची सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीव काम, डोळ्यांची सजीवता आणि आकर्षक व रूबाबदार नैसर्गिक रंगकाम यामुळे त्यांनी स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या गणेशमूर्तींना मुंबई सह पालघर व ठाणे जिल्ह्यात भरपूर मागणी आहे.
गेल्या १२ वर्षापर्वी आशिष यांचा भाऊ सुशील यांनी सुरू केलेला हा कारखाना भव्य स्वरूपात आहे. मोजक्याच आॅर्डर घेऊन ते मूर्ती बनवत आहेत. सुशील हा ही निष्णात मूर्तीकार असून त्याने उलवा (पनवेल) येथे प्रशिक्षण घेतले असून या बंधूंनी या व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे. गणपती, गौरी मातेच्या घरगुती व सार्वजनिक मूर्ती येथे बनविल्या जातात. आपल्या कारखान्यात ६५० मूर्ती तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मूर्त्या शाडू तसेच प्लास्टर आॅफ पॅरिस पासून घडवल्या जातात. या व्यवसायात दोघे बंधू व आणखी दहा कामगार पाच महिने हा धंदा करतात. असे आशिष याने सांगितले. यावर्षी बाजीराव मस्तानी व लालबागचा राजा या मूर्तीना अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरगुती गणेशमूर्ती मध्ये विविध नक्षीकाम असलेल्या विशेषत: रंगबेरंगी खड्यांचे नक्षीकाम असलेल्या मूर्तीना अधिक मागणी आहे.
एक फुटांपासून पंधरा फूटांपर्यत उंचीच्या या मूर्ती असतात. त्यांची किंमत १ हजारापासून १५ हजारापर्यत आहे. या वर्षी पंधरा टक्क्यांनी भाव वाढले असल्याचे सुशीलने सांगितले. नैसर्गिक रंगकाम हे आमचे खास वैशिष्टयÞ आहे असे ते आर्वजून सांगतात. कुंभार कामाचा आमचा वडिलोपार्जित धंदा असल्याने त्या कामाचा आम्हाला अनुभव आहे. आणि त्यामुळेच आम्ही आता या व्यवसायाकडे वळलो आहोत. शिल्पकार ही पदवी संपादन केल्याने त्याचा फायदा या व्यवसायात आम्हाला होत असल्याचे आशिष याने सांगितले. (वार्ताहर)
मुंबई, ठाणे, पालघर येथून मागणी
गणेश मूर्तीकारांचे कामाचे तास वाढले असून बाप्पाच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वाडा शहरातील कुंभार आळी येथील श्री गणेश आर्ट या कारखान्याच्या मूर्तीकारांचेही काम अंतिम टप्प्यात असून येथे बनवल्या जाणाऱ्या आकर्षक व रेखीव गणेश मूर्तीना मुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्यÞात दरवर्षी सर्वाधिक मागणी असते. विशेष म्हणजे काही मूर्ती येथून औरंगाबाद येथेही नेल्या जातात.