दोन लाखांची लाच मागताना उपसरपंचाला अटक
By Admin | Published: August 31, 2016 06:23 PM2016-08-31T18:23:29+5:302016-08-31T18:23:29+5:30
तालुक्यातील शिरजगाव देशमुख गट ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम तोताराम वानखडे यास २ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. ३१ - तालुक्यातील शिरजगाव देशमुख गट ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम तोताराम वानखडे यास २ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली.
शहरातील विजयराज नरेंद्र देशमुख रा.शिवाजी वेस यांचे शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत विजयलक्ष्मी हॉटेल अॅन्ड लॉजींग आहे. या हॉटेल अॅन्ड लॉजींग समोरील जागेत पार्कींगकरीता टिनशेड उभारण्याकरीता त्यांनी ग्रामपंचायतकडे परवानगी मागितली असता बळीराम वानखडे, उपसरपंच ग्रा.पं. शिरसगाव देशमुख यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी त्यांचेकडे केली होती. याबाबतची तक्रार विजयराज नरेंद्र देशमुख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा येथे नोंदविली होती.
या तक्रारीवरून २५ जुलै २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता त्यावेळी उपसरपंच बळीराम वानखडे यांनी विजयलक्ष्मी हॉटेल अॅन्ड लॉजींग समोर पार्कींगकरिता टिनशेड उभारण्याची परवानगी देण्यासाठी तडजोडीअंती पहिला हप्ता ७५ हजार रूपये लाचेची स्पष्ट मागणी केली होती. त्यानंतर २६ जुलै २०१६ रोजी पैसे स्विकारण्याचे ठरले होते. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कार्यवाही आयोजित केली असता, सापळा कार्यवाही दरम्यान बळीराम वानखडे उपसरपंच यांना तक्रारदारावर काहीतरी संशय आल्याने त्यांनी त्यांचेकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही व लाच न स्विकारता लगेच निघून गेले. त्यामुळे त्यांचेविरूध्द कलम ७, १५ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे लाच मागणीबाबत गुन्हा नोंद करण्यात येवून अटक करण्यात आली आहे.
ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलिस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विलास पाटील, पोनि एस.बी. भाईक, एएसआय शाम भांगे, सुभाष शेकोकार, पोना संजय शेळके, प्रदीप गडाख, पोकाँ विजय वारूळे, निलेश सोळंके, चालक पोहेकाँ रविंद्र लवंगे यांनी केली.