मागण्यांचे सोंग पुरे; आता पाठपुरावा करा

By admin | Published: February 22, 2016 04:28 AM2016-02-22T04:28:03+5:302016-02-22T04:28:03+5:30

नाट्यसंमेलनामध्ये नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्याविषयीच्या अनेकविध मागण्या नाट्य परिषद करते; मात्र, त्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जात नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र

The demands of the demands are sufficient; Follow up now | मागण्यांचे सोंग पुरे; आता पाठपुरावा करा

मागण्यांचे सोंग पुरे; आता पाठपुरावा करा

Next

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : नाट्यसंमेलनामध्ये नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्याविषयीच्या अनेकविध मागण्या नाट्य परिषद करते; मात्र, त्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जात नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाट्य परिषदेला लगावला. ठाण्यातील मासुंदा तलावात अ‍ॅम्फी थिएटर, शतकमहोत्सवी संमेलन ठाण्यात घेतल्यास मेट्रो रेल्वेतून संमेलनास हजर राहण्याचा शब्द आणि अन्य मागण्यांसाठी बैठक, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
९६व्या अ.भा. नाट्यसंमेलनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांना बैठकीकरिता जायचे असल्याने अन्य वक्त्यांनी भाषणे अक्षरश: आटोपती घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, नाट्य परिषदेच्या मंडळींनी माझ्याकडे बॅकस्टेज आर्टिस्टच्या घरांपासून परिषदेच्या भूखंडापर्यंत अनेक मागण्या केल्या. मात्र, नाट्य परिषदेच्या मंडळींची व मुख्यमंत्र्यांची भेट केवळ नाट्यसंंमेलनाच्या समारोपावेळी होते. त्यामुळे मागच्या संमेलनात काय बोललो, ते पुढच्या संमेलनात आम्हाला आठवत नाही. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांनी अशाच मागण्या केल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातील साऱ्यांनी होकार भरला होता. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी लवकरच मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक बोलावतो आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनाही त्याकरिता पाचारण करतो, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

पुढच्या वेळी मेट्रोने येईन
साहित्य अथवा नाट्यसंमेलन असो, अलीकडे मूळ विषय बाजूला पडून वेगळ्याच विषयावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, ठाण्यातील हे संमेलन वादातीत राहिले. ठाणे शहर सांस्कृतिक शहर असले तरी ९६ वर्षांत या शहराला संमेलनाचा मान मिळाला नाही, असे नमूद करून ते म्हणाले, नाट्यसंमेलनाचे शतक ठाण्यातच साजरे व्हावे. त्यासाठी मी मेट्रोत बसून ठाण्याला येईन, असा शब्द देत आहे. महापालिका आयुक्तांनी मासुंदा तलावात अ‍ॅम्फी
थिएटर उभारण्याचा प्रस्ताव मला पाठवल्यास तो मी मंजूर करेन, असेही ते म्हणाले.

शरद पवार, विनोद तावडे अनुपस्थित
संमेलनाच्या समारोप सोहळ्यास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, गृहराज्यमंत्री राम शिंदे आदी मान्यवरांनी दांडी मारली.

आमदारांनी नाट्यस्पर्धा घ्यावी
राज्यातील प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारक्षेत्रात नाट्यस्पर्धा घ्यावी, त्यातून निवडलेल्या नाटकांमधून सर्वोत्कृष्ट नाटके निवडली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त करून नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी राज्यव्यापी नाट्यचळवळीचा एक उपक्रम सुचवला.

Web Title: The demands of the demands are sufficient; Follow up now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.