हजार मारावे अन् एक मोजावे, असे लोक आहेत भाजपमध्ये; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 01:23 PM2022-02-22T13:23:21+5:302022-02-22T13:23:54+5:30
मुंबईत व महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात महाराष्ट्रद्रोही राजकीय भाषेचा बुरखा वापरून राज्यावर थुंकत असेल तर तसेच उत्तर देऊ. आम्हाला कोणीही मराठी शिकवू नये, असे राऊत म्हणाले.
नागपूर - महाराष्ट्राच्या राजकारणाचे संस्कार व संस्कृती अद्यापही कायम आहे. परंतु जे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत व ज्यांना मराठी भाषेबाबत द्वेष आहे, त्यांच्याशी त्याच भाषेत बोलले पाहिजे. भाजपमध्ये काही लोक तर हजार मारावे अन् एक मोजावे असे आहेत, या शब्दांत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुंबईत व महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात महाराष्ट्रद्रोही राजकीय भाषेचा बुरखा वापरून राज्यावर थुंकत असेल तर तसेच उत्तर देऊ. आम्हाला कोणीही मराठी शिकवू नये, असे राऊत म्हणाले.
देशात आघाडी होणार अशी चर्चा आहे. मात्र, ‘आघाडी’ वगैरे शब्द बरोबर नाहीत. तिसरी, चौथी आघाडी असे प्रयोग यशस्वी झालेले नाहीत. निवडणुका आल्या की, अशा आघाडींची चर्चा होते. भविष्यातील राजकीय दिशेबाबत मुख्यमंत्र्यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा झाली. दोन नेते व देशातील विरोधी पक्षांतील इतर नेते लवकरच भेटणार आहेत. काँग्रेसशिवाय कुठलीच आघाडी बनणार नाही. काँग्रेसला सोबत घेतले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. देशात लोकशाही संपत आहे व उत्तर प्रदेशमध्ये भाजप हरत आहे. भाजपने आम्हाला ज्ञान देऊ नये. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. त्यांचा पक्ष कणाकणाने संपत आहे, असा दावा राऊत यांनी केला.