सत्तापक्षांत खडाखडी!

By admin | Published: October 14, 2015 04:01 AM2015-10-14T04:01:55+5:302015-10-14T04:02:13+5:30

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून शिवसेना-भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांत सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपाचा फड चांगलाच रंगला आहे

Democrats! | सत्तापक्षांत खडाखडी!

सत्तापक्षांत खडाखडी!

Next

मुंबई : पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून शिवसेना-भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांत सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपाचा फड चांगलाच रंगला आहे. दोघेही परस्परांना ‘राष्ट्रभक्ती’चे धडे देत, एकमेकांचे पुरते वस्त्रहरण करत आहेत, तर दुसरीकडे सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे सांगत हे तर जणू ‘पेल्यातील वादळ’ असल्याचेच संकेत शिवसेनेने दिले.
एके काळी भाजपाचे थिंक टँक असणारे सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शाई फासून शिवसेनेने थेट सरकारलाच आव्हान दिल्याचे मानले जात असतानाच, शिवसेनेचा विरोध मोडीत काढून सरकारने कसुरींच्या पुस्तकाचे प्रकाशन यशस्वीरित्या पार पाडले. शिवाय, शाईफेकीच्या गुन्ह्यात काही शिवसैनिकांनाही अटक केली. त्यामुळे या प्रकरणात एकूणच फटफजित झाल्याने शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ती साफ फेटाळण्यात आली. ‘शिवसेनेने सत्तेतून बाहेर का पडायचे? आमची राष्ट्रभक्ती भाजपाला टोचत असेल, तर त्यांनीच राजीनामा द्यावा. शिवसेनेखेरीज राज्य करून दाखवावे किंवा भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार चालवावे,’ असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले.
‘कालच्या घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, विदेशी गुंतवणुकीवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यावरही राऊत यांनी टिप्पणी केली. ‘शिवसेनेच्या प्रखर राष्ट्रवादी भूमिकेमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली नसून, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच महाराष्ट्राची बदनामी झाली,’ असे ते म्हणाले.
‘सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांवर टीका करणे योग्य नाही,’ असे सांगत, ‘संपूर्ण घटनाक्रमाचा सरकारच्या स्थैर्यावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही,’ असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. शिवसेनेकडून उमटलेल्या प्रतिक्रियेचा भाजपा प्रवक्त्यांनी चांगलाच समाचार घेतला. (विशेष प्रतिनिधी)
>> मुख्यमंत्र्यांमुळेच बदनामी!
मुंबई : शिवसेनेच्या प्रखर राष्ट्रवादी भूमिकेमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली नसून, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच महाराष्ट्राची बदनामी झाली, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. राऊत म्हणाले की, ‘शिवसेनेच्या सोमवारच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेची प्रखर राष्ट्रवादी भूमिका अयोग्य ठरवण्यामुळेच महाराष्ट्र बदनाम झाला. पाकिस्तानची बेकायदेशीर घुसखोरी त्यांना कशी चालते. पाकिस्तानबाबतची शिवसेनेची भूमिका नवीन नाही. गेली ३० ते ३५ वर्षे आम्ही हीच भूमिका घेतली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बस घेऊन लाहोरला गेले, तेव्हा शिवसेनेने विरोध केला होता. समझोता एक्स्प्रेस सुरू झाली, तेव्हाही शिवसेनेने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्याच भूमिकेच्या अनुषंगाने कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाला विरोध केला, तर त्यामध्ये महाराष्ट्राची बदनामी कशी झाली, हा आमचा सवाल आहे.’
‘लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम राष्ट्रवादी भूमिका घेतली. त्यांच्या वक्तव्यानेही महाराष्ट्राची बदनामी झाली, असे मुख्यमंत्री म्हणणार का?’ असा सवाल करून राऊत म्हणाले की, ‘उलटपक्षी कालच्या कसुरीविरोधी आंदोलनात भाजपा सहभागी झाला असता, तर त्यांचा प्रखर राष्ट्रवाद दिसला असता.’ (विशेष प्रतिनिधी)
>>इतरांच्या मताचाही आदर करा - कुलकर्णी
शिवसेनेच्या मुखपत्रातून मंगळवारी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर बेलगाम टीका करण्यात आली. शिवसेनेला अशी टीका करण्याचा अधिकार असला, तरी इतरांच्या मतांचाही आदर करा, असे वक्तव्य सुधींद्र कुलकर्णी यांनी टिष्ट्वटरद्वारे केले.
>>राऊत यांच्या पाकवारीचा समाचार
‘आमची राष्ट्रभक्ती सिद्ध करणारे अनेक दाखले आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत दोनवेळा पाकिस्तानात जाऊन आले, तेव्हा ते मित्रराष्ट्र होते का,’ असा सवाल भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला, तर ‘जावेद मियांदाद मातोश्रीवर गेला ते कसे चालले,’ असा सवाल आ. कदम यांनी केला. ‘डॉ. आंबेडकर स्मारक भूमिपूजनाकरिता ठाकरे यांना आमंत्रित करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता मातोश्रीवर गेले. उद्योगमंत्री सुभाष देसाई समारंभासाठी येतील, असे त्यांना सांगण्यात आले, पण विचारांपेक्षा ‘इगो’ महत्त्वाचा ठरला,’ असा चिमटाही त्यांनी काढला.
>>त्या शिवसैनिकांना शाबासकी
आॅब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या शिवसैनिकांना मंगळवारी मातोश्रीवर बोलावून त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ‘पाकिस्तानला पायघड्या घालणाऱ्या एजंटांचे तोंड काळे करून तुम्ही राष्ट्रभक्तीचे कार्य केले आहे. यापुढेही असेच काम करीत राहा,’ असे ठाकरे यावेळी म्हणाले.

Web Title: Democrats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.