कानउघाडणीनंतर दानवेंची दिलगिरी
By admin | Published: May 12, 2017 03:39 AM2017-05-12T03:39:05+5:302017-05-12T03:40:41+5:30
‘तूर खरेदी केली तरी रडतात साले’ या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कानउघाडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘तूर खरेदी केली तरी रडतात साले’ या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दानवे यांनी आज त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तो (‘साले’) शब्द आपण शेतकऱ्यांना उद्देशून म्हटलेला नव्हता, असा खुलासाही त्यांनी केला. दानवेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्यभरात उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचेही कार्यकर्ते दानवेंच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले.
सूत्रांनी सांगितले की, दानवेंचे वक्तव्य देशभरातील वृत्तपत्रे आणि चॅनेल्सनी ते दाखविल्यानंतर त्याची गंभीर दखल भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी घेतली आणि दानवेंना दिलगिरीचे पत्रक काढण्यास सांगण्यात आले. दानवेंनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून खुलासा केला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनीही त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याची सूचना केली. त्यानंतर दुपारीच त्यांचा ‘दिलगिरीनामा’ जारी करण्यात आला.
या दिलगिरीनाम्यात दानवे यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जालना येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांशी संवाद साधणे व तो शेतात जाऊन साधणे, अशा प्रकारची चर्चा झाली. परंतु एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि केंद्र सरकारने पुन्हा एक लाख टन तुर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. अशामध्ये माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. यामध्ये मी शेतक-यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. मी स्वत: शेतक-याच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतक-यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतक-यांची बाजू घेत सतत ३५ वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतक-यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतक-यांशी जोडू नये. परंतु यावरही शेतक-यांची मनं दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे दानवे यांनी म्हटले आहे.
दानवेच राहू द्या - पवार
रावसाहेब दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राहणे हे विरोधकांच्या फायद्याचे आहे. उगाच त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता? असा मार्मिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लगावला.