दानवेंचे वक्तव्य; तूर खरेदी केली तरी रडतात साले !
By Admin | Published: May 11, 2017 03:19 AM2017-05-11T03:19:21+5:302017-05-11T03:19:21+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांबाबत बोलताना पुन्हा जीभ घसरली आहे. एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांबाबत बोलताना पुन्हा जीभ घसरली आहे. एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य केल्याबद्दल दानवे यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.
जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दानवे बोलत होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने, तूर खरेदीबाबत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे, असा सवाल केला. या अनपेक्षित प्रश्नाने दानवेंचा पारा चढला. ते म्हणाले, एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, असली रडगाणी आता बंद करा, अशी मुक्ताफळे दानवे यांनी उधळली.
सत्तेची नशा डोक्यात गेली - विरोधक
राज्यात तूर खरेदीचा मुद्दा तापलेला असताना, खा.दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. खा. दानवे यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतला.
दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सत्तेची नशा डोक्यात गेल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत.
- खा. अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
यापूर्वीही वादग्रस्त व्यक्तव्यामुळे दानवे अडचणीत आले होते. कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या थांबणार, अशी लेखी हमी द्या, अशी मागणी त्यांनी केली होती.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कार्यकर्त्यांना उद्देशून आपण ते वक्तव्य केले होते. शेतकरी हितासाठीच भाजपा सरकार बांधील असून, त्या दृष्टीनेच निर्णय घेतले जात आहेत. - खा. रावसाहेब दानवे