स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर निदर्शनं
By admin | Published: April 14, 2017 12:43 PM2017-04-14T12:43:07+5:302017-04-14T13:12:50+5:30
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, मोदींचा ताफा दीक्षाभूमीतून निघाल्यावर घोषणा
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. मोदी यांनी दीक्षाभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी कोराडी येथे जात असताना पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी निदर्शनं केली.
शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्यासमोर ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी "अब ना चलेगा कोई बहाना, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे" या घोषणांनी दीक्षाभूमीचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी नारेबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात विदर्भ राज्य आघाडीचे सुरेश लोलणो, शैलेंद्र हारोडे, संदीप सावरकर, अॅड.संजय नेरकर, राजीव तेलंग व फहीम अंसारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं. शिवाय, तेथील गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवलेही होते.
महानिर्मितीच्या कोराडी येथील तीन संचाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी पारडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात वीज संचाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कोराडी वीज प्रकल्पाची पाहणी करीत महानिर्मितीच्या कार्याचे कौतुक केले.
कोराडी येथील तीन संच १४ हजार ८०० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये १७० मीटर उंचीचे तीन कुलिंग टॉवर असून चिमणीची उंची २७५ मीटर आहे. प्रकल्पाला ९.१ मिलियन मेट्रिक टन कोळसा आणि ६४ दलघमी पाणी प्रत्येक युनिटला लागणार आहे. यातीलन ४९.५ दलघमी पाणी नागपूर महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून घेण्याच्या उपक्रमाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.
चंद्रपुरातील दोन वीज संचावर ७००४ कोटी खर्च करण्यात आले असून १६७ हेक्टर जागेत ते उभारण्यात आले आहे. परळीतील संचावर २०८१ कोटी रुपये खर्च करण्यात येऊन तो १३० हेक्टर जागेमध्ये आहे.
कोराडी येथील तिन्ही संच हे जपानच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील पहिले विद्युत संच आहे, हे विशेष! त्यामुळे उत्पादन खर्चात आणि त्यासोबतच प्रदूषणातही घट होणार आहे.