भाजपा सरकारविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:01 AM2018-05-24T00:01:47+5:302018-05-24T00:01:47+5:30
जनतेला मोठीमोठी आश्वासने आणि भूलथापा देऊन केंद्रात आणि नंतर राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे.
ठाणे : एनडीए सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनता बेहाल झाली आहे. चोर, लुटारू मालामाल झाले असल्याचा आरोप करून, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये भाजपा सरकारविरोधात बुधवारी निदर्शने करण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनएकता-जनअधिकार-जनआंदोलन या बॅनरखाली विविध संघटनांनी जोरदार घोषणाबाजीतून भाजपावर हल्लाबोल करून निदर्शने केली. याप्रसंगी महिलांची संख्या अधिक होती. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर भविष्यात ‘भारत बंद’ची हाक दिली जाऊ शकते, असे विश्वास उटगी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जनतेला मोठीमोठी आश्वासने आणि भूलथापा देऊन केंद्रात आणि नंतर राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत हे सरकार सर्व क्षेत्रांत अपयशी ठरलेले आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार, नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बेकारीत वाढ होत आहे, तसेच महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाल्याने रोजगारांमध्ये घट झाली. जीएसटीमुळे महागाई वाढली. इन्कम टॅक्स, कॉर्पाेरेट टॅक्समध्ये सवलती देऊन श्रीमंतांनाच फायदा झालेला आहे. नोटाबंदी करून अब्जावधींचा काळा पैसा पांढरा करण्याची नामी संधी या सरकारने उपलब्ध करून भ्रष्टाचाºयांना अभय दिले. या व्यतिरिक्त आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा विकास, उद्योग, शेती इ. क्षेत्रांमधील अनागोंदी कारभारामुळे जनता त्रस्त झालेली आहे. शेतकºयांच्या हालअपेष्टा वाढलेल्या आहेत. कर्जमाफी आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतीमालाला भाव देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता होत नाही. अंगणवाडी कर्मचाºयांना दिलेल्या मानधनवाढीचे आश्वासन पाळले गेले नाही. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ यासारख्या घोषणा करूनही नवीन उद्योग फारसे निघालेले नाही. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्टÑ राज्य किसान सभा, भारतीय महिला फेडरेशन, समृद्धी महामार्गविरोधी किसान संघर्ष समिती, सर्व श्रमिक संघ, आयटक,स्वराज शेतकरी,महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आदी संघटनांनी सहभागी होऊन निदर्शने केली. विश्वास उटगी यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
यापुढे ‘भारत बंद’ आंदोलन : पत्रकारांशी बोलताना उटगी यांनी सांगितले की, येत्या २६ मे ला भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत, तर यांच्यामुळे चोर, लुटारू मालामाल झाले आहे, तसेच ते राज्यघटनेची मोडतोड करून लोकशाहीचा खून करत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी, तसेच सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी देशभर १०६ संघटना एकत्र आल्या आहेत. यापुढे ‘भारत बंद’ आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.