महावितरणविरोधात निदर्शने
By admin | Published: July 18, 2016 04:04 AM2016-07-18T04:04:46+5:302016-07-18T04:04:46+5:30
ग्राहकांच्या व्यथा मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
वसई : प्रचंड प्रमाणात येत असलेल्या वीज बिलामुळे हैराण झालेल्या ग्राहकांच्या व्यथा मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. आमदार आनंद ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
वसई विरार परिसरातील सात ग्राहकांना विजेची मोठमोठी बिले येत आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण झाले असून त्याविरोधात निदर्शने करण्यात आली. ग्राहकांना सुधारित बिले पाठवण्यात यावीत. तोपर्यंत वसुली थांबवावी. सदोष मिटरमुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. त्यासाठी सदोष मीटर बदलण्यात यावीत. मिटर रिडींग नियमितपणे घेतली जात नसल्याने स्लॅब पद्धतीचा फटका बसून ग्राहकांना जादा बिले दिली जातात. त्यासाठी नियमितपणे रिडींग घेतले जावे. डिपॉझिटच्या माध्यमातून होणारी लूट थांबवण्यासाठी ही वसूल बंद करावी, अशा मागण्या केली.
वसई विरार परिसरात सात लाख ग्राहक आहेत. मात्र, त्यामानाने कर्मचारी, अधिकारी आणि कार्यालयांची संख्या खूपच कमी आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यासाठी ग्राहक संख्येवर आधारित पद्धतीनुसार वसईत कर्मचारी आणि कार्यालये कार्यान्वित करण्यात यावीत, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
वसईतील पोल आणि तारा जुनाट
वसईतील पोल आणि तारा जुनाट झाल्याने त्या कोसळून अपघात होतात. वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. त्यासाठी जुनाट पोल आणि तारा बदलण्यात याव्यात. तसेच शक्यतो भूमिगत केबल टाकण्यात याव्यात. टोल क्रमांक कायम बंद असतो. ग्राहकांच्या तक्रारी निवारणासाठी तो नियमितपणे सुरु करण्यात यावा, अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष गुंजाळकर यांनी केली.