ऋषी कपूर यांच्याविरोधात निदर्शने
By admin | Published: May 19, 2016 02:36 AM2016-05-19T02:36:30+5:302016-05-19T02:36:30+5:30
बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी गांधी कुटुंबियांबाबत केलेल्या वादग्रस्त टिष्ट्वटनंतर संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा जाहीर निषेध केला
मुंबई : बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी गांधी कुटुंबियांबाबत केलेल्या वादग्रस्त टिष्ट्वटनंतर संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा जाहीर निषेध केला. बुधवारी पाली हिल परिसरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सात कार्यकर्त्यांनी खार पोलिसांनी अटक केली.
बहुतेक राष्ट्रीय मालमत्तांना गांधी कुटुंबाचं नाव का आहे? इंदिरा गांधी विमानतळ हेच नाव का आहे? त्याचे नाव भगत सिंह, आंबेडकरही ठेवता आले असते, किंवा ऋषी कपूरही. असे टिष्ट्वट ऋषी कपूर यांनी बुधवारी केले. त्यानंतर या विषयी टिष्ट्वटरवर चर्चा रंगली. देशातील महत्त्वाच्या ठिकाणांचे किंवा भागांचे नाव अशा व्यक्तींच्या नावावर असावे, ज्यांनी देशासाठी काही योगदान दिले असेल. प्रत्येक गोष्ट गांधींच्या नावे. मी सहमत नाही. जर दिल्लीच्या रस्त्यांचे नाव बदलू शकते, तर राष्ट्रीय मालमत्तांना काँग्रेस सरकारने दिलेली नावे का बदलू शकत नाही. मी चंदीगडमध्ये होतो. तिथे पण राजीव गांधींची संपत्ती...यानंतरही त्यांनी टीकास्त्र सुरुच ठेवले.
त्यांच्या या वादग्रस्त टिष्ट्वट्सनंतर कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारी पाली हिल परिसरात कपुरविरोधात निदर्शने करण्यात आली. पोलिसांंनी मध्यस्थी घेत येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. ७ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची सुटकाही करण्यात आल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली.