रेल्वे अपघाताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रात्यक्षिक
By admin | Published: April 3, 2017 01:46 AM2017-04-03T01:46:21+5:302017-04-03T01:46:21+5:30
शहरात भोंगे वाजल्यानंतर रेल्वे अपघात झाला असावा किंवा आग लागली असावी
दौंड : शहरात भोंगे वाजल्यानंतर रेल्वे अपघात झाला असावा किंवा आग लागली असावी, असे संकेत या भोंग्यांद्वारे मिळतो. आज सकाळी ९.४५ च्या सुमारास रेल्वेचे भोंगे वाजले आणि त्यानुसार दौंड-मनमाड-नांदेड पॅसेंजरला दौंड रेल्वे स्थानकात अपघात झाला.
याची वार्ता शहरात पसरली त्यानुसार शहरातील नागरिकांनी सेवाभावी संस्थांनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. तेव्हा येथील रेल्वे हॉस्पिटलजवळ पोलीस, रुग्णवाहिका, रेल्वे कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते अशी मोठी गजबज दिसून आली.
मात्र, अपघाताचे प्रात्यक्षिक असल्याचा निर्वाळा नागरिकांना मिळताच रेल्वे प्रवाशांसह नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
यावेळी सोलापूर विभागाचे अप्पर रेल्वे प्रबंधक महेंद्रसिंग उत्पल, मुख्य चिकित्सा अधिकारी पी. के. शर्मा, वरिष्ठ मंडल सुरक्षा अधिकार व्ही. एस. प्रभाकरे, शिवाजी कदम, डॉ. एल. के. सचिव, सुधारमा संजीव, रेल्वे सुरक्षा बल आयुक्त विजय राऊत, स्टेशन प्रबंधक एस. एन. सिंग, सतीश सोनवणे, डॉ. समीर कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, अनुज कुमार, एस. एन. निरंजन यांच्यासह रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रेल्वे अपघात प्रात्यक्षिकात महत्त्वाची भूमिका बजावली.(वार्ताहर)
रेल्वेचा अपघात झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी, अधिकारी, पोलीस यासह संबंधित यंत्रणा कितपत जागृत आहे. याचा पडताळा आणि याचबरोबरीने अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत कशा स्वरूपात करायची याबाबत प्रात्यक्षिक झाले. यातील काही पुतळ्यांना रक्त लावण्यात आले. परिणामी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी अपघातग्रस्तांना उपचारासाठी स्ट्रेचरवर नेत आहेत. अपघातस्थळी आपतकालीन यंत्रणेसह उपचाराचे तंबू उभारण्यात आले होते.