विलिनीकरणानंतरही देना-विजया बँकेचे एटीएम धनादेश वटणार , ग्राहकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 07:17 PM2019-04-01T19:17:49+5:302019-04-01T19:21:36+5:30
बँक ऑफ बडोदामध्ये विजया व देना बँकेचे विलिनीकरण सोमवारपासून (दि. १) लागू झाले.
पुणे : बँक ऑफ बडोदामध्ये विजया व देना बँकेचे विलिनीकरण सोमवारपासून (दि. १) लागू झाले. बँकांची विलिनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी बँक व्यवस्थापनाची घडी बसेपर्यंत देना व विजया बँकेचे एटीएम, धनादेश, खातेक्रमांक पूर्वी प्रमाणेच सुरु राहील. या बँकांना बडोदा बँकेची सुविधाही वापरता येईल, अशी माहिती बँक ऑफ बडोदाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
तिन्ही बँकांचे विलिनीकरण झाल्यानंतर बँक ऑफ बडोदा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक झाली आहे. विलिनीकरणानंतर बँकेच्या देशभरातील शाखांची संख्या साडेनऊ हजारांहून अधिक होणार असून, वार्षिक उलाढाल १५ लाख कोटींच्या वर जाईल. पुणे विभागीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक (पूवीर्ची विजया बँक) जे. राम गोपाल आणि उप महाव्यवस्थापक (देना) महेंद्रसिंग रोहेरिया या वेळी उपस्थित होते.
बँकेच्या विलिनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यात देना व विजया बँकेतील माहिती तंत्रज्ञान विभागाचे एकात्मिकीकरण होईल. त्यासाठी तिन्ही बँकांच्या खातेदारांची माहिती एका कोअर बँकींग सिस्टीमवर समाविष्ट केली जाणार आहे. त्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा कालावधी लागेल. एप्रिल अखेरीस बँकेच्या सर्व शाखांमध्ये बँकींग सुविधा सुरु करण्यात येईल. या व्यवस्था बदलाच्या कालावधीत ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांचे एटीएम कार्ड, धनादेश अशा सर्व सुविधा जुन्या बँकेच्या चालू राहतील. आता या पुढे सर्व ग्राहकांना बँक ऑफ बडोदाची कर्ज आणि इतर सेवा लागू होतील. तसेच, व्याज दर देखील बडोदा बँकेचेच राहतील.
--
विलिनीकरणानंतर बँक ऑफ बडोदाचे बळ होणार तिप्पट
-बँकेच्या शाखांची संख्या ९५०० आणि एटीएमची संख्या होणार १३,४०० हून अधिक
- कर्मचाऱ्यांची संख्या ८५ हजार आणि ठेवीदार-खातेदार १२ कोटींहून अधिक
- वार्षिक उलाढाल जाणार १५ लाख कोटी रुपयांवर, ठेवी ८.७५ लाख कोटींवर
- महाराष्ट्रात बँक व्यवसायातील ८ ते १० टक्के वाटा येणार बडोदा बँकेकडे
- पीपल कॅपिटल इंडेक्समध्ये (पीसीआय) आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये स्थान
अनुत्पादक खातीही बडोदा बँकेची
बँक ऑफ बडोदामध्ये नक्त (नेट) अनुत्पादक खात्यांचे (एनपीए) प्रमाण ५ टक्क्यांच्या आत असून, विजयाचा बँकेचे ४ आणि देना बँकेचा नेट एनपीए १० टक्के इतका आहे. बँकेच्या मालमत्तेबरोबरच देणी देखील बँक ऑफ बडोदाकडे येईल.