डेंग्यू आणि क्षयरोगाचा विळखा

By admin | Published: July 13, 2017 01:56 AM2017-07-13T01:56:22+5:302017-07-13T01:56:22+5:30

मुंबईमध्ये क्षयरोग (टीबी) आणि डेंग्यूने थैमान घातल्याची श्वेतपत्रिका प्रजा फाउंडेशनने बुधवारी जाहीर केली आहे.

Dengue and tuberculosis | डेंग्यू आणि क्षयरोगाचा विळखा

डेंग्यू आणि क्षयरोगाचा विळखा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईमध्ये क्षयरोग (टीबी) आणि डेंग्यूने थैमान घातल्याची श्वेतपत्रिका प्रजा फाउंडेशनने बुधवारी जाहीर केली आहे. क्षयरोगामुळे गेल्या वर्षभरात दररोज साधारण १८ लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब प्रजाने माहिती अधिकारात उघड केली आहे. तर डेंग्यूच्या रुग्णांतही गेल्या पाच वर्षांत अडीच पटीने वाढ झाल्याचे भीषण वास्तव प्रजाने समोर आणले आहे.
प्रजाने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेनुसार, क्षयरोगाच्या रुग्णांत सुमारे १४ हजार रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१२-१३ साली ३६ हजार ४१७ क्षयरुग्ण असलेल्या मुंबईला क्षयमुक्त करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. कारण गेल्या चार वर्षांत क्षयरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली असून, क्षयरुग्णांचा आकडा तब्बल ५० हजारांवर गेला आहे. तर दररोज सरासरी १८ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने होत असताना क्षयनिर्मूलनासाठी असलेल्या डॉट्स केंद्रांत येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१२ साली ३० हजार ८२८ रुग्ण डॉट्स केंद्रांत उपचार घेत होते. याउलट २०१६मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५ हजार ७६७पर्यंत घसरली आहे.
गेल्या पाच वर्षांत डेंग्यूनेही मुंबईत हात-पाय पसरल्याची माहिती या वेळी समोर आली आहे. २०१२-१३ सालात डेंग्यूच्या ४ हजार ८६७ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात २६५ टक्क्यांनी वाढ होत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २०१६-१७मध्ये तब्बल १७ हजार ७७१ रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे डेंग्यूला आळा घालण्यात महापालिकेला अपयश आल्याचे दिसते.
नगरसेवक उदासीन
क्षयरोगाबाबत नगरसेवकांमध्येही उदासीनता दिसत असल्याचे प्रजाचे म्हणणे आहे. कारण माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार, डॉट्समध्ये क्षयरोगाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दरवर्षी १० टक्क्यांनी गळती होत आहे.
तरीही गेल्या पाच वर्षांत महापालिकेत नगरसेवकांनी क्षयरोगावर केवळ ४५ प्रश्न विचारले आहेत. याउलट रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंदे्रयांच्या नामकरणाबाबत नगरसेवकांनी ६८ प्रश्न विचारले आहेत. यावरून नगरसेवकांना रुग्णालयातील सेवेहून त्याचे नाव अधिक महत्त्वाचे वाटते, असा निष्कर्ष निघतो.
>८९,८१८ मुंबईकरांचा
गतवर्षी मृत्यू
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळात ८९,८१८ मुंबईकरांनी मृत्यू झाल्याची नोंद पालिकेत आहे. त्यात मलेरियामुळे १२७ मृत्यू झाले.डेंग्यूमुळे जीव गमावलेल्या नागरिकांची संख्या १४८ आहे. क्षयरोगाने तब्बल ६ हजार ४७२ रूग्णांचा जीव घेतला.अतिसारामुळे २२५ मुंबईकरांना जीव गमवावा लागला. कॉलरामुळे ८, तर टायफॉईड ६ आणि एचआयव्ही एड्समुळे ४०४ रूग्णांचे जीव गेले.मधुमेहामुळेही एकूण २ हजार ६ ७५ नागरिकांचा मृत्यूू झाल्याची नोंद आहे.हायपर टेन्शनमुळे तब्बल ४ हजार ४३८ नागरिकांचा अकाली मृत्यू झाला आहे.७५ हजार ३१५ मुंबईकरांच्या मृत्यूची नोंद इतर कारणाने झाली आहे.
>डेंग्यू
के पूर्व वॉर्डमध्ये २२४ रुग्ण आढळले.
एल वॉर्डमध्ये १४४ रुग्णांची नोंद आहे.
आर उत्तर वॉर्डमध्ये १०८ रुग्णांना डेंग्यू झाला.
क्षयरोग
एल वॉर्डमधील कुर्ला परिसरात टीबीचे १ हजार २५४ रुग्ण आढळले आहेत.
एच पूर्व वॉर्डमधील सांताक्रुझ विभागात ६५९ रुग्णांची नोंद आहे.
आर दक्षिण वॉर्डमधील कांदिवलीमध्ये ४९३ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदर्शनास आले आहे.
अतिसाराचा
चिमुरड्यांना धोका
मुंबईतील चिमुरडे अतिसाराचे बळी पडत असल्याचेही प्रजाने उघड केले आहे. कारण अतिसारामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये सुमारे ३ पैकी १ मृत्यू हा ४ वर्षे व त्याखालील वयाच्या बालकांचा आहे.

Web Title: Dengue and tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.