महिनाभरात डेंग्यूचे आढळले २६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2016 07:58 PM2016-09-06T19:58:03+5:302016-09-06T19:58:03+5:30
शहरात डेंग्यूची साथ सुरू असून दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होत आहे़
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 6 - शहरात डेंग्यूची साथ सुरू असून दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होत आहे़ आॅगस्ट महिन्यात मनपाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून तपासून घेतलेल्या १५८ रूग्णांच्या रक्त नमुन्यांपैकी तब्बल २६ रूग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे मनपातर्फे युध्दपातळीवर उपाययोजना सुरू असून गुरूवारी डेंग्यूबाबत चर्चेसाठी स्थायी समितीची सभा होणार आहे़
शहरात महिनाभरापासून डेंग्यूने थैमान घातले आहे़ खासगी दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश आजाराचे रूग्ण दाखल असून त्यांच्या रक्ताचे नमुने मनपातर्फे हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून तपासून घेतले जात आहेत़ शिवाय आरोग्य विभागाकडून युध्दपातळीवर उपाययोजनाही सुरू आहेत़
जुलैपर्यंत केवळ ५ रूग्ण
जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूचे ५ रूग्ण आढळले होते़ मात्र आॅगस्ट महिन्यात तब्बल २६ जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे़ दिवसेंदिवस डेंग्यूच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने मनपातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ अॅबेटिंग, धुरळणी, फवारणीसह जनजागृतीवर देखील भर दिला जात आहे़ मात्र तरीही डासांच्या उत्पत्तीची घनता वाढत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे़
डेंग्यूमुळे मनपात तणाव
मनपात डेंग्यूवरून महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाद झाले आहेत़ गौरी कापडणेकर या तरूणीच्या मृत्यूनंतर डेंग्यूकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी ७ आॅगस्टला डेंग्यूबाबत मनपात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली होती़ खासगी दवाखान्यांमधील रूग्णांचे नमुने डेंग्यू झाल्याचे दर्शवित असतांना मनपाने तपासलेल्या अहवालात डेंग्यू का नाही? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला़ त्यामुळे महिनाभर डेंग्यूमुळे मनपात तणाव होता़
अशा उपाययोजना सुरू
शहरात सध्या दर सात दिवसांनी डासोत्पत्ती स्थानांवर किटकनाशक फवारणी करण्यात येत आहे, कंटेनर सर्वेक्षण व अॅबेटिंग, विहीरी व मोठ्या गटारींमध्ये डास अळीनाशक गप्पी मासे सोडण्यात येतात, अविकसित भागात शासनाचे तापसर्वेक्षण केले जात आहे़ डेंग्यू व हिवताप प्रसारक डास घनता जास्त असलेल्या परिसरात तसेच संशयित डेंग्यू, हिवताप रूग्ण घर परिसरात किटकनाशकाची धुरळणी करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे़
मलेरियाचेही दोन रूग्ण
दरम्यान शहरात मलेरियाबाबत तापसर्वेक्षण केले जात असून तापाच्या रूग्णांना उपचारही दिले जात आहेत़ जानेवारी ते जुलै या कालावधीत मनपाने २४ हजार ९२९ रूग्णांचे रक्त नमुने तपासले असून त्यापैकी कोणालाही मलेरिया झालेला नाही़ तर आॅगस्ट महिन्यात ५ हजार १४६ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी दोन जणांना मलेरिया झाल्याचे स्पष्ट झाले आहे़
चाचणीबाबत ठोस निर्णय हवा
खासगी रूग्णालयात डेंग्यू, मलेरिया निष्पन्न होत असतांना मनपाने केलेल्या तपासणीत ते निष्पन्न होत नाही़ त्यामुळे खासगी दवाखाने व मनपाकडून होणारी तपासणी एकच असावी, यासाठी ठोस निर्णय आवश्यक आहे़ वेगवेगळया तपासणी अहवालामुळे संभ्रमावस्था निर्माण होत असून उपचाराबाबतही साशंकता निर्माण होते़ खासगी रूग्णालयांना याबाबत निर्बंध आणण्याचे अधिकार मनपाला नसल्याने हा संभ्रम निर्माण होत असला तरी त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवून कार्यवाही केली जाऊ शकते़
>स्थायीच्या सभेत अहवाल येणाऱ़़
मनपा स्थायी समितीची सभा गुरूवारी सकाळी ११ वाजता होणार असून या सभेत आरोग्य विभागाकडून सुधारीत अहवाल सादर केला जाणार आहे़ मागील सभेत अहवाल सादर करण्यात आला होता मात्र त्यातून स्पष्टता होत नसल्याने सुधारीत अहवालाची मागणी करण्यात आली होती़ शिवाय हा अहवाल सदस्यांना एक दिवस अगोदर दिला जाणार आहे़ गेल्या सभेत ऐनवेळी अहवाल सादर करण्यात आल्याने सदस्यांनी तो सभेतच फाडून फेकला होता़ त्यामुळे यावेळी खबरदारी घेतली जाणार आहे़