पाणी समस्येमुळेच डेंगीचा फैलाव
By admin | Published: November 6, 2014 04:09 AM2014-11-06T04:09:10+5:302014-11-06T04:09:10+5:30
शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी आजही काही भागांत कमी दाबाने अथवा अनियमितपणे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण अधिक आ
ठाणे : शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी आजही काही भागांत कमी दाबाने अथवा अनियमितपणे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. साठवलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ््या आढळतात. त्यामुळेच डेंगीचा प्रसार अधिक होत असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरातील रायलादेवी, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा परिसरांत डेंगीच्या सर्वाधिक म्हणजेच ४ हजार ११४ अळ्या आढळल्या आहेत.
डेंगीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जूनपासून घरोघरी जाऊन घरातील पाण्याचे नमुने तपासले. रायलादेवी, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा परिसरांत हे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती या सर्व्हेतून पुढे आली आहे. उर्वरित प्रभाग समित्यांमध्ये हे प्रमाण तुरळक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. हे परिसर अत्यंत दाटीवाटीचे असून तिथे अनधिकृत इमारती, चाळी तसेच झोपड्या मोठ्या प्रमाणात आहेत. काही भाग डोंगरावर असल्याने तेथे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळेच डासांची पैदास अधिक असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
डेंगीसंदर्भात जनजागृती करणारी पोस्टर्स, बॅनर्स तयार करण्यात आली आहेत. साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या तयार होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परराज्यांतून कामासाठी येणाऱ्या मजुरांची तपासणी करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)