डेंग्यू डासाच्या अळ्या आढळल्यास दंड!
By admin | Published: October 14, 2014 01:00 AM2014-10-14T01:00:21+5:302014-10-14T01:00:21+5:30
घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या दिसून आल्यास त्या घरमालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार महानगरपालिका करीत आहे. यासाठी कायद्यात तरतूद करण्याचा प्रस्ताव
नागपूर : घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या दिसून आल्यास त्या घरमालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार महानगरपालिका करीत आहे. यासाठी कायद्यात तरतूद करण्याचा प्रस्ताव हिवताप व हत्तीरोग विभागाने मनपाच्या संबंधित विभागाकडे पाठविला आहे.
डेंग्यू रोगावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने घराघरांची तपासणी मोहीम सुरू आहे. डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्यास त्यावर उपाययोजना केल्या जात आहे. परंतु त्याच त्याच घरांमध्ये अळ्या आढळून येत असल्याने विभागाला काम करणे कठीण झाले आहे. सध्याच्या स्थितीत विभागाकडून अळ्या आढळून येणाऱ्या घरमालकाला नोटीस दिली जात आहे. परंतु याचा परिणाम दिसून येत नसल्याचे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. घरांमध्ये डेंग्यू रोगाचे रुग्ण असतानाही लोक गंभीर नाही. यावर कठोर कारवाई करण्यासाठी हिवताप व हत्तीरोग विभागाने पाऊल उचलले आहे. डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्याची परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या संदर्भात कायदा तयार करण्यासाठी मनपाच्या संबंधित विभागाला पत्र पाठविल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
डेंग्यूचा दुसरा बळी
शहरात या वर्षी डेंग्यूचे १३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून एका मृत्यूची नोंद होती. परंतु १ आॅॅक्टोबरला डेंग्यू संशयित तापाने मृत्यू झालेल्या माधवनगर येथील पद्मजा दाणी या तेरा वर्षीय मुलीच्या रक्ताचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. डेंग्यूमुळे बळीची संख्या दोन झाली आहे.