यंदा ‘डेंग्यू’ रुग्णांची संख्या दुप्पट !

By admin | Published: November 6, 2014 09:02 PM2014-11-06T21:02:37+5:302014-11-06T22:01:31+5:30

तब्बल ४१ रुग्ण : गेल्या वर्षापेक्षा संख्या वाढली; आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना

Dengue patients double this year! | यंदा ‘डेंग्यू’ रुग्णांची संख्या दुप्पट !

यंदा ‘डेंग्यू’ रुग्णांची संख्या दुप्पट !

Next

नितीन काळेल - सातारा राज्यात सर्वत्रच डेंग्यूने थैमान घातले असून, याबद्दल सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला सातारा जिल्हाही अपवाद राहिलेला नाही. मागील वर्षापेक्षा जिल्ह्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. त्यांच्या वतीने विविध उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ४१ रुग्ण आहेत. मागील एक महिन्यापासून सर्वत्रच डेंग्यूबद्दल चर्चा आहे. डेंग्यूमुळे राज्यात अनेकांना जीव गमवावाही लागला आहे. यामध्ये काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शासनालाही जाग आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळीवर डेंग्यूबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य पथकाच्या वतीने लोकांना आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
काही वर्षांपूर्वी शहराच्या ठिकाणी आढळणारे डेंग्यूचे रुग्ण आता ग्रामीण भागातही आढळत असल्याने आरोग्य विभागाच्या काळजीचा हा विषय झाला आहे. याला कारण म्हणजे ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात बांधकामे होताना दिसून येत आहेत. त्यामुळे विविध बांधकामाच्या ठिकाणी पाणीसाठा करण्यात येत आहे. हे पाणी अनेक दिवस तसेच ठेवण्यात येत आहे. त्याचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे अशा पाण्यात डेंग्यूच्या डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्याचा विचार करता यंदा रुग्णांची संख्या निश्चितपणे वाढल्याचे दिसून येत आहे. मागीलवर्षी जानेवारी ते आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात २५ डेंग्यूचे रुग्ण होते. यंदा त्यामध्ये मोठी वाढ प्रथमच झाल्याचे दिसून येत आहे. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४१ रुग्ण डेंग्यूचे आढळून आलेले आहेत. रुग्णांचा हा आकडा निश्चितच चिंतेचे वातावरण निर्माण करणारा आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. कऱ्हाड तालुक्यात तब्बल १३ रुग्ण आहेत. जिल्ह्यात आढळून आलेल्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. त्यांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

मागील वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४१ रुग्ण आढळून आलेले आहेत. मागीलवर्षी ही संख्या २५ इतकी होती. आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळीवर जागृती सुरू आहे. त्याला निश्चितपणे यश येत आहे. जिल्ह्यात लवकरच डेंग्यू आटोक्यात येईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. दिलीप माने,
जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्ह्यात डेंग्यूचा एकादा संशयित आढळून आल्यास त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतात. त्या रक्ताची तपासणी येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात केली जाते. त्यानंतरच संबंधितांना डेंग्यू झाला आहे की नाही, हे निश्चित करण्यात येते.
इडिस इजिप्तीचे डास प्रामुख्याने शहरी भागात आढळतात. तसेच आता ते ग्रामीण भागातही आढळून येत आहेत.
या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे त्यांना ओळखायला सोपे जाते.
वाहनांचे टायर, मडकी, पाण्याच्या टाक्या आदींमध्ये साचलेल्या पाण्यात इडिस इजिप्तीची पैदास मोठ्या प्रमाणात होते.
घराशेजारील पाण्याची डबकी तत्काळ मुजविणे. परिसराची स्वच्छता राखणे महत्त्वाचे असते.
अनेक दिवस साचून राहिलल्या पाण्याचा निचरा केल्याने डासांची पैदास होत नाही.

‘त्या’ मृत्यूबद्दल अद्याप अनिश्चितता...
जिल्ह्यात डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरी संबंधितांचा मृत्यू डेंग्यूमुळेच झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयित म्हणून संबंधिताचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे गृहित धरण्यात आलेले आहे. अद्याप तसे जाहीर झालेले नाही, असे सांगण्यात आले.

परिसर स्वच्छतेला प्राधान्य
जिल्ह्यात डेंग्यूबाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी घराबरोबच परिसराची स्वच्छता करण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांनी डबक्यात तसेच नाल्यात बऱ्याच दिवसांपासून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यास सुरूवात केली आहे. घरातील पाण्याने भरलेली भांडीदेखील रिकामी केली आहेत. आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकही संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढे सरसावले आहेत.


जिल्हा रुग्णालयात पाच जणांवर उपचार
जिल्ह्यात आत्तापर्यंत डेंग्यूचे ४१ रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही रुग्ण आजारातून बरेही झाले आहेत. सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या डेंग्यूच्या पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Dengue patients double this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.