मंंगळ असल्याचे सांगून विवाहास नकार
By Admin | Published: November 2, 2016 12:52 AM2016-11-02T00:52:39+5:302016-11-02T00:52:39+5:30
साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी मुलीला मंगळ असल्याचे कारण सांगून विवाह करण्यास नकार दिल्याची घटना वाघोलीतील एक कुटुंबासोबत घडली.
वाघोली : साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी मुलीला मंगळ असल्याचे कारण सांगून विवाह करण्यास नकार दिल्याची घटना वाघोलीतील एक कुटुंबासोबत घडली.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची फिर्याद दिली. अमरावतीतील नवऱ्या मुलासह आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश विष्णू राऊत आणि त्याचे वडील विष्णू राऊत (रा. अमरावती) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोली येथील एका कुटुंबातील एक मुलीचे अमरावती येथील विष्णू राऊत यांचा मुलगा प्रकाश राऊत यांच्यासोबत लग्न ठरविण्यात आले होते. २८ आॅगस्ट रोजी वाघोली येथील मंगल कार्यालयामध्ये साखरपुडा देखील झाला होता. डिसेंबर महिन्यामध्ये विवाहाची तारीख ठरवण्यात आली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी विवाहास आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. मात्र, काही दिवसांनंतर राऊत कुटुंबांकडून मुलीला मंगळ असल्याचे कारण सांगून विवाह करण्यास नकार दिला.
मुलीच्या वडिलांनी मुलीला मंगळ नसल्याचे सांगूनदेखील मान्य करण्यात आले नाही. यामुळे विवाह रद्द करण्यात आला. लग्नानिमित्त करण्यात आलेला खर्च, कुटुंबाची झालेली नाचक्की आणि मंगळ असल्याचे क्षुल्लक कारण देऊन विवाह रद्द करून फसवणूक केल्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)
>आधुनिक विज्ञान युग असतानादेखील मुलीला मंगळ असल्याचे क्षुल्लक कारण देऊन विवाह सहज मोडणे ही गोष्ट शोभणारी नाही. लग्नासाठीचा खर्च वाया गेलाच,परंतु कुटुंबाचीदेखील नाचक्की झाली आहे. मुलाकडील सुशिक्षित असतानादेखील अशा गोष्टी घडत असतील, तर अशा प्रवृतींना धडा शिकवणे गरजेचे आहे.
- मुलीचे वडील