मिस्त्रींचा ताठर पवित्रा, समूह कंपन्यांवरून दूर होण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 04:23 AM2016-11-04T04:23:09+5:302016-11-04T04:23:09+5:30

चेअरमनपद स्वत:हून न सोडण्याची भूमिका सायरस मिस्त्री यांनी घेतल्याने, देशातील या सर्वात मोठ्या उद्योगसमूहात नवा पेच निर्माण होण्याचे संकेत आहेत.

Denial of mechanics, refusal of removal from group companies | मिस्त्रींचा ताठर पवित्रा, समूह कंपन्यांवरून दूर होण्यास नकार

मिस्त्रींचा ताठर पवित्रा, समूह कंपन्यांवरून दूर होण्यास नकार

Next


मुंबई : टाटा उद्योग समूहाची नियंत्रक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून दूर केल्यानंतरही, समूहातील अनेक कंपन्यांचे चेअरमनपद स्वत:हून न सोडण्याची भूमिका सायरस मिस्त्री यांनी घेतल्याने, देशातील या सर्वात मोठ्या उद्योगसमूहात नवा पेच निर्माण होण्याचे संकेत आहेत.
समूहाच्या चेअरमन पदावरून हटविल्यानंतर मिस्त्री आपणहून समूहातील कंपन्यांवरील पदे सोडतील, अशी समूहाच्या धुरिणांची अपेक्षा होती, परंतु समूहातील कंपन्यांचे चेअरमनपद सोडण्याचा मिस्त्री यांचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करताना, त्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले की, मिस्त्री समूहामधील त्यांच्या सर्व पदांची कायदेशीर जबाबदारी या पुढेही पार पाडत राहतील. समूहातील प्रत्येक कंपनी, कंपनी कायद्यानुसार स्वतंत्रपणे नोंदलेली आहे व तिचे स्वतंत्र संचालक मंडळ आहे. मिस्त्रींनी या कंपन्यांचे चेअरमनपद स्वत:हून सोडले नाही, तर प्रत्येक कंपन्यांच्या संचालक मंडळात त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून त्यांना दूर करावे लागेल. ही प्रक्रिया वेळकाढू तर आहेच, शिवाय समूहात निर्माण झालेला वादंग सामोपचाराने मिटविण्याऐवजी, त्यामुळे कटुता आणखी वाढण्याची शक्यता निरीक्षकांना वाटते. टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल ब्रुअरेजेस, टाटा इंडस्ट्रिज व टाटा टेलिसर्व्हिसेस अशा समूहातील अनेक कंपन्यांचे मिस्त्री हे अद्यापही चेअरमन आहेत. त्रैमासिक हिशेबांना मंजुरी देण्यासाठी इंडियन हॉटेल्स आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठका अनुक्रमे उद्या (४ नोव्हेंबर) व १० नोव्हेंबर रोजी व्हायच्या आहेत. त्या बैठका चेअरमन या नात्याने मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली होणे अपरिहार्य आहे. (विशेष प्रतिनिधी)
>शेअरहोल्डर्सची संमती आवश्यक
सायरस मिस्त्री टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स या समूहातील बड्या कंपन्यांच्या चेअरमनपदावर आहेत, तसेच टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांचे ते आजही संचालक आहेत. या संचालक मंडळावरून त्यांना हटवणे सोपे नाही. कारण त्याला शेअरहोल्डर्सची परवानगी लागेल. शेअरहोल्डर्स सहजासहजी मिस्त्री यांना संचालकपदावरून हटवण्यास संमती देतील का, याविषयी उलटसुलट मते व्यक्त होत आहेत.
>टाटा-मिस्त्री वादावर सरकारची नजर - मेघवाल
रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्या वादावर केंद्र सरकारची नजर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले. १00 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा व्यवसाय असलेल्या टाटा उद्योग समूहातील ताज्या घडामोडींचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सरकारची त्यावर नजर आहे.
तथापि, या वादापासून सरकार दूरच राहील. कंपनीचा हा अंतर्गत मामला आहे. या वादाबाबत आतापर्यंत कॉर्पोरेट मंत्रालयाकडे लिखित स्वरूपात काहीही आलेले नाही, असे मेघवाल यांनी सांगितले. रतन टाटा व सायरस मिस्त्री या दोघांनी अलीकडेच स्वतंत्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि समूहातील वादांबाबत आपले म्हणणे त्यांच्या कानी घातले होते.

Web Title: Denial of mechanics, refusal of removal from group companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.