उपाध्यायच्या बंदोबस्तास नकार

By admin | Published: February 8, 2017 05:05 AM2017-02-08T05:05:18+5:302017-02-08T05:05:18+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हा उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या सभागृहात प्रवेशासाठी इच्छुक आहे.

Denied Upadhyaya's closure | उपाध्यायच्या बंदोबस्तास नकार

उपाध्यायच्या बंदोबस्तास नकार

Next

जमीर काझी, मुंबई
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हा उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या सभागृहात प्रवेशासाठी इच्छुक आहे. मात्र त्याच्या निवडणूक प्रचारावेळी पोलीस संरक्षण पुरविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल तयार नाही. त्याला बंदोबस्तात उत्तर प्रदेशात सोडू, त्यानंतर त्यानी स्थानिक पोलिसांकडून बंदोबस्त घ्यावा, असा निर्र्णय पोलिसांनी घेतला आहे. त्याबाबत लवकरच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात प्रस्ताव दिला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
रमेश उपाध्याय हा सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहे. निवडणुकीसाठी त्याला न्यायालयाने तीन आठवड्याचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. मात्र या कालावधीत सशुल्क सशस्त्र बंदोबस्त (एस्कॉर्ट) पुरविण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. मात्र तेथील भौगोलिक परिस्थिती आणि कायदा, सुव्यवस्थेबाबत अनभिज्ञ असल्याने महाराष्ट्राचे पोलीस पाठविणे योग्य नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे त्याबाबतचा अहवाल लवकरच न्यायालयात सादर केला जाणार आहे.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी हिंदू महासभेने रमेश उपाध्यायला बैरिया या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचे हे मूळ गाव असून निवडणुकीत सहभागी होण्यासाठी विशेष न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सात एप्रिल ते सात मे या कालावधीतील ३ आठवडे निश्चित करुन त्याला प्रचारसभेत सहभागी होता येणार आहे. मात्र त्याला या पूर्ण कालावधीत सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरवून त्याच्या प्रत्येक हालचाली, भेटणाऱ्या व्यक्ती, येणारे फोन यांचा सविस्तर रेकॉर्ड ठेवण्याची सूचना न्यायालयाने पोलिसांना केली आहे. त्यानुसार सध्या तो तळोजा कारागृहात असल्याने त्याची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांवर आली आहे. त्यामुळे या कार्यक्षेत्रातून त्याला जामीनाच्या काळात सशस्त्र बंदोबस्त पुरवावा लागणार आहे. मात्र उत्तरप्रदेशातील स्थानिक परिस्थिती, भौगोलिक माहिती, उपाध्यायबाबत स्थानिकांमध्ये असलेली भावना याबाबत नवी मुंबई पोलिसांना काहीही माहिती नाही. त्याचप्रमाणे तेथील कायदा व सुव्यवस्थेबाबत अनभिज्ञ असल्याने नवी मुुंबई पोलिसांना तेथे बंदोबस्तासाठी पाठविणे योग्य होणार नाही. त्याऐवजी त्याला उत्तर प्रदेशाच्या सीमेपर्यंत पुरेशा बंदोबस्तात पाठवू, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त पुरवावा, असा निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. परतताना त्याला पुन्हा ताब्यात घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव बनविण्यात आला असून कोर्टात सादर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२००८ मध्ये मालेगाव येथे झाालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या कटात साध्वी प्रज्ञासिंग, श्रीकांत पुरोहित यांच्यासह उपाध्यायचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तत्कालिन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी त्याला अटक केली होती. राज्यात व केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर मात्र ‘एनआयए’ने या खटल्याबाबत सौम्य भूमिका घेतल्याची चर्चा विरोधकांकडून होत असते. याबाबत आपल्याला खटल्यातून बाजूला होण्याची सूचना तत्कालिन अधिकारी सुहास वारके यांनी केली होती, असा आक्षेप घेत ज्येष्ठ सरकारी वकील रोहिनी सॅलियन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

Web Title: Denied Upadhyaya's closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.