पहाटे दाट धुके, दुपारी कडक ऊन!
By admin | Published: April 12, 2017 09:08 PM2017-04-12T21:08:36+5:302017-04-12T21:08:36+5:30
गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जादा तापमानाचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना बुधवारी पहाटेच्या सुमारास धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद मिळाला.
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 12 : गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जादा तापमानाचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना बुधवारी पहाटेच्या सुमारास धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद मिळाला. पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत शहर अक्षरश: धुक्यात गायब झाले होते. पहाटे जॉगिंग, वॉकिंगला बाहेर पडणाऱ्यांनी धुक्याचा हा सुखद धक्का अनुभवला. दुपारनंतर मात्र पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवला. दुपारी सांगलीचा पारा ४२ अंशापर्यंत गेला होता.
गेल्या आठवड्याभरापासून सांगलीकर उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होत असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांना गारव्याचा अनुभव आला. पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसर्गाचा हा चमत्कारही अनुभवता आला. पसरलेले धुके आणि थंडीमुळे शहरवासीयांना उकड्यातून काहीसा थंडावा मिळाला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.
पहाटे लवकर सुरू होणाऱ्या चहा-नाष्ट्याच्या गाड्यांवर कामावर जाणाऱ्यांची, तसेच फिरायला जाणाऱ्यांची गर्दी झाली. हिमवर्षाव झाल्यानंतर किंवा तीव्र थंडीची लाट आल्यानंतर जशा तोंडातून गरम वाफा बाहेर पडतात, तसाच अनुभव बुधवारी सकाळी नागरिकांना आला. गावभाग, कृष्णा नदीकाठ परिसर, आमराई, वखारभाग, खणभाग, विश्रामबाग, कोल्हापूर रस्ता आदी भागातून आठ-साडेआठनंतरच नागरिकांची नित्यकामाची लगबग जाणवू लागली. धुक्याचे हे वातावरण टिपण्यासाठी अनेकांनी सेल्फी काढून घेतली. अनेकांनी सोशल मीडियावरून मित्रमंडळी, नातेवाईकांशी, हा धुक्याचा आनंद लुटण्यासाठी संपर्क साधला होता. सकाळच्या हुडहुडी भरविणाऱ्या या गारव्याचा आनंद काही तासच टिकला. दुपारनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला. दुपारच्या सुमारास तब्बल ४२ अंशावर पारा गेला होता.
शिराळा पश्चिम भाग गारठला
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके पसरले होते. वाहनधारकांना वाहनांचे दिवे लावूनच वाहन चालवावे लागत होते. शिराळा तालुक्याचे पश्चिम भागातील कोककणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पावलेवाडी खिंडीपासून चांदोलीपर्यंत मंगळवारी मध्यरात्रीपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके होते. हवेत थंडी होती, गारठा जाणवत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यात अडथळे निर्माण झाले होते. शाळकरी मुलांना परीक्षेसाठी धुक्यातून वाट काढतच जावे लागले.