गरजू मुलींना देहव्यापाराला लावणाऱ्यांना जामीन नाकारला
By admin | Published: June 13, 2017 01:03 AM2017-06-13T01:03:58+5:302017-06-13T01:03:58+5:30
नोकरीचे आमिष दाखवून गरजू मुलींना देहव्यापाराला लावणाऱ्या दोन महिला आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून गरजू मुलींना देहव्यापाराला लावणाऱ्या दोन महिला आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला.
नागपुरातील शब्बो ऊर्फ शालिनी अझहर खान (३८) व गडचिरोली येथील उषा ऊर्फ अर्चना राजू पेंदाम (३०) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. काही मुलींकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती गोवा येथील ‘अर्ज’ या अशासकीय संस्थेला २०१३मध्ये मिळाली होती. संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्या जबाबावरून गरजू मुलींना देहव्यापाराला लावणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला. रॅकेटमध्ये एकूण १२ आरोपी सामील होते.
गडचिरोली सत्र न्यायालयाने ३१ मार्च २०१७ रोजी सर्व आरोपींना विविध प्रकारची शिक्षा सुनावली.
शिक्षेविरोधात आरोपींचे अपील
उषा व शब्बोने शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आहे़ या अपीलासोबतच त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता़ उभयंतांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला़