देवनारचा कचरा पुन्हा पेटला!
By admin | Published: March 21, 2016 03:39 AM2016-03-21T03:39:13+5:302016-03-21T03:39:13+5:30
पूर्व उपनगरातील डम्पिंग ग्राउंडच्या आगीने महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आणले असतानाच, रविवारी पुन्हा देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने पेट घेतला. ही आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन
मुंबई : पूर्व उपनगरातील डम्पिंग ग्राउंडच्या आगीने महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आणले असतानाच, रविवारी पुन्हा देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने पेट घेतला. ही आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलातर्फे घटनास्थळी आठ फायर इंजिन आणि आठ वॉटर टँकर्स पाठवण्यात आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत होते.
मागील दोन महिन्यांपासून देवनार डम्पिंग ग्राउंडला सातत्याने आग लागत आहे. मार्च महिन्यांत दुसऱ्यांदा देवनार डम्पिंगला आग लागली आहे. याबाबत महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवनार डम्पिंग ग्राउंडवर दोन दिवसांपासून लहान-लहान आगी लागत होत्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते, परंतु रविवारी या आगीने रौद्र स्वरूप धारण केले. दुपारी आग भडकल्याने देवनारलगतच्या परिसरात आगीच्या धुराचे साम्राज्य पसरले. स्थानिकांना धूराचा अधिक त्रास जाणवू लागला आणि पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले होते. आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार, १७ मार्च रोजी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली होती.डम्पिंग प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे गणेश शेट्टी यांनी या संदर्भात सांगितले की, पालिकेच्या उपाययोजना कागदावरच आहेत.
प्रत्यक्षात आग लागू नये, म्हणून प्रशासन ठोस उपाययोजना करत नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डम्पिंग हटवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे.