मर्जितल्या ठेकेदारांना काम देण्याचा उद्यान विभागाचा डाव
By admin | Published: May 14, 2017 01:07 AM2017-05-14T01:07:33+5:302017-05-14T01:07:33+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे स्थापत्यची अनेक कामे प्रस्तावित आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे स्थापत्यची अनेक कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. मर्जीतील आणि नेहमीच्याच ठेकेदारांना हाताशी धरून संबंधित निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया पारदर्शी नसून यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. उद्यान विभागाच्या या अनागोंदी कारभाराला आळा घालून संबंधित निविदा प्रक्रिया स्थगित करावी, या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.
सत्तांतर झाल्यानंतर भाजपाची सत्ता आली आहे. उद्यान विभागातील गैरकारभारावर आक्षेप घेतला आहे. महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे अनागोंदी आणि बेशिस्त कारभाराला आळा घालावा, अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.
उद्यान विभागातर्फे महापालिकेच्या अबकडईआणि फ या सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वृक्षरोपणासाठी खड्डे खोदणे आणि माती टाकणे या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. काही ठेकेदारांना हाताशी धरून संबंधित कामांची निविदा मिळविली जाते. मर्जीतील ठेकेदारांना या निविदा प्रक्रियेत झुकते माप देत निविदा प्रक्रियेतील गोपनियतेचा भंग केला जातो. निविदेची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. निविदेत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी खर्च अपेक्षित धरला आहे. या निविदेत खड्डे किती घेणार, किती ठिकाणी माती कशी टाकणार आदी बाबींचा तपशील नाही. त्यामुळे ही निविदा दिशाभूल करणारी आहे. अधिकारी केवळ वेळ मारून नेत सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचे यातून दिसून येते.
पारदर्शी कारभाराला तिलांजली
ही बाब संबंधित अधिकाऱ्यांना लक्षात न येणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमतेबाबत आणि संबंधित विषयातील त्यांच्या अभ्यासाबाबत प्रश्न उपस्थित होतात. असे असले तरी, केवळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने दिशाभूल करणारी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतून निविदेच्या गोपनियतेचा भंग होऊन कायद्याची पायमल्ली करण्यात येत आहे. याचा फटका महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला बसणार आहे. कारण महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. पारदर्शी कारभार करण्याचे भाजपाचे धोरण आहे. या धोरणाला तिलांजली देत उद्यान विभागातील अधिकारी कोणालाही न जुमानता मनमानी कारभार करत आहे. ही बेशिस्त आणि अनागोंदी कारभार थांबविणे आवश्यक आहे.
झाडे फक्त कागदोपत्रीच
उद्यान विभागात पारंपरिक पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या निविदा दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. प्रत्यक्षात कामे झाल्याचे दिसून येत नाही. यातून मोठा भ्रष्टाचार करण्यात येत आहे. महपालिकेच्या संकेतस्थळावरदेखील या निविदा प्रसिद्ध केल्या जातात; मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून अशा निविदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात विलंब केला जातो. परिणामी निविदा प्रक्रिया सदोष होते. दहा वर्षांतील उद्यान विभागातर्फे केलेल्या कामांची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.