गणित आणि विज्ञान शिक्षकांच्या राज्यात विभागीय परिषदा

By admin | Published: June 17, 2016 12:30 PM2016-06-17T12:30:46+5:302016-06-17T12:30:46+5:30

गणित आणि विज्ञान शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावरील परिषद दर एक वर्षाआड भरवण्यात येते. गेल्या वर्षी यातली आठवी परिषद डिसेंबर २०१५ मध्ये पुण्यात झाली

Departmental Council for Mathematics and Science Teachers | गणित आणि विज्ञान शिक्षकांच्या राज्यात विभागीय परिषदा

गणित आणि विज्ञान शिक्षकांच्या राज्यात विभागीय परिषदा

Next
>- प्रा.सुधीर पानसे
गणित आणि विज्ञान हे शालेय स्तरावरील दोन कळीचे विषय. तळमळीने शिकवणारे अनेक शिक्षक, विद्यार्थ्यांना हे विषय  नीट समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करतात. वेगळ्या वाटा चोखाळतात. शिकवण्याचे नवे प्रयोग करून पाहतात. यातले  अनेक प्रयोग, शिकवण्याच्या पद्धती अनुकरणीयही असतात. पण त्यासाठी अशा प्रयत्नांची माहिती सर्व शिक्षकांपर्यंत पोचायला तर हवी ना? तसेच अशा नव्या प्रयोगांचे काटेकोर मूल्यमापन देखील करायला हवे. हे घडवायचे कसे?
याच विचारातून गणित आणि विज्ञान शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावरील परिषद दर एक वर्षाआड भरवण्यात येते. गेल्या वर्षी यातली आठवी परिषद डिसेंबर २०१५ मध्ये पुण्यात झाली. ‘मराठी विज्ञान परिषदे’ (मविप) ने यासाठी पुढाकार घेतला होता. देशातील एकूण २५० शिक्षक यात सहभागी झाले होते.त्यात महाराष्ट्रातील ४७ शिक्षक होते.
अक्षरशः काश्मीरपासून केरळपर्यंत, आणि पंजाब पासून मणिपूरपर्यंत सा-या देशातले शिक्षक तेथे होते. कोणी अणू-रेणूंची रचना सहज समजावण्यासाठी मार्ग शोधले होते. कोणी संख्याशास्त्रातील अमूर्त संकल्पना सोप्या केल्या होत्या. कोणी भौतिकशास्त्रातील संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत किती पोचल्या आहेत हे जाणून घेण्याची नवी पद्धत वापरली होती. कोणी विद्यार्थ्यांकरवी स्थानिक वनस्पतींची पहाणी करून त्यातून उपयुक्त पदार्थ बनवले होते. तर कोणी खेड्यात मिळणा-या साध्या घरगुती गोष्टी वापरून विद्यार्थ्यांकडून प्रकल्प करवून घेतले होते. एक-ना-दोन! शेकडो गोष्टी! अनेक नव्या कल्पना! आणि त्या सादर करणा-या शिक्षकांची प्रचंड ऊर्जा! 
या उपक्रमाची उपयुक्तता आणि त्यातून शिक्षकांमध्ये निर्माण होणारा उत्साह लक्षात घेऊन ‘मविप’ने आता महाराष्ट्रात गणित आणि विज्ञान विषयांच्या शालेय शिक्षकांच्या व तत्सम कार्यकर्त्यांच्या पाच विभागीय परिषदा भरवण्याचे ठरवले आहे. तारखा व जागा  पुढीलप्रमाणे. 
धुळे: १३ ऑगस्ट, पुणे: २० ऑगस्ट, औरंगाबाद: २४ सप्टेंबर, भंडारा: १२ नोव्हेंबर, रत्नागिरी: २६ नोव्हेंबर.
इयत्ता सहावी पासून बारावी पर्यंत शिकवणारे विज्ञान व गणिताचे शालेय शिक्षक, बी. एड. व डी. एड. चे विद्यार्थी व प्राध्यापक, निवृत्त शिक्षक, शालेय शिक्षणात रस घेणारे प्राध्यापक, तंत्रज्ञ, वैज्ञानिक व स्वयंसेवी संस्थांमधील कार्यकर्ते, ज्यांनी हे विषय शिकवण्यासाठी नवे प्रयोग केले असतील, व त्याला  विद्यार्थ्यांकडून मिळणा-या प्रतिसादाची ज्यांनी व्यवस्थित पहाणी केली असेल, अशा सर्वांचे या परिषदांमध्ये आपापल्या पद्धती सादर करण्यासाठी स्वागत आहे.
शिक्षण क्षेत्रातील अशा उपक्रमशील लोकांनी आपले हे  शिकवण्यासंबंधीचे प्रयोग व त्यांची फलनिष्पत्ती याची माहिती देणारे २००० शब्दांचे निबंध, व त्याचा ५०० शब्दातील सारांश (इंग्लिश अथवा मराठी अथवा हिंदीत भाषेत) ‘मविप’कडे २०जुलै २०१६ पर्यंत मराठी विज्ञान परिषद,विज्ञान भवन,वि.ना.पुरव मार्ग,शीव-चुनाभट्टी,मुंबई ४०० ०२२,फोन क्रमांक ०२२-२४०५४७१४ अथवा ०२२-२४०५७२६८ येथे पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवावा.(लक्षात घ्या, लिखाणाचे स्वरूप अनुभव कथन करणाऱ्या, किंवा अन्य शिक्षकांना उपदेश करणाऱ्या लेखाचे नसावे. नेमका शिकवण्यातील वेगळा प्रयोग काय होता व त्याचा परिणाम काय झाला हे त्या लिखाणात असावे.)
आलेल्या निबंधांमधून ५०० निबंध निवडले जातील, व ते पाच ठिकाणच्या परिषदांमध्ये सादर केले जातील. सादर करण्यासाठी बोलावलेल्या मंडळींचा प्रवास-भोजन-नाश्ता इत्यादीसाठीचा सारा खर्च ‘मविप’ करेल. (आणि परिषदेत अशा प्रकारे निमंत्रित केलेल्या शिक्षकांनाच फक्त सहभागी होता येईल.) पाचही परिषदा झाल्यानंतर त्यांचा एक अहवाल पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात येईल, ज्यात सर्वोत्तम अशा ५० निबंधांचा समावेश असेल.
आपण जर गणित/विज्ञान विषयांचे शिक्षक असाल, आणि प्रयोगशील शिक्षक असाल, तर जरूर या उपक्रमात सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी ‘www.scienceteacherscongress.org’ या संकेतस्थळाला भेट देत रहा.
 
- प्रा. सुधीर पानसे

Web Title: Departmental Council for Mathematics and Science Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.