डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेला अखेर ‘मुहूर्त’

By Admin | Published: June 28, 2016 04:06 AM2016-06-28T04:06:21+5:302016-06-28T04:06:21+5:30

पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतरही अधिकारी बनण्यास इच्छुक असलेल्या हजारो अंमलदारासाठी एक खुशखबर आहे.

Departmental PSI examination finally concludes 'Muhurat' | डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेला अखेर ‘मुहूर्त’

डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेला अखेर ‘मुहूर्त’

googlenewsNext

जमीर काझी,

मुंबई- पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतरही अधिकारी बनण्यास इच्छुक असलेल्या हजारो अंमलदारासाठी एक खुशखबर आहे. गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या मर्यादित विभागीय उपनिरीक्षक परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २१ आॅगस्टला मुंबईसह राज्यभरातील सात केंद्रावर ८२८ पदासाठी परीक्षा होणार आहे.
तीन वर्षांपासून रखडलेल्या ‘डिपार्टमेंटल पीएसआय’ परीक्षेसाठी इच्छुक पोलिसांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. त्यांना ११ जुलैपर्यत एमपीएससीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या परीक्षेसाठी पदवीधर कॉन्स्टेबलसाठी ४ वर्षे व बारावी उर्त्तीण असलेल्यांसाठी ५ वर्षे सेवा पूर्ण असणे ही प्रमुख अट आहे. त्याचप्रमाणे वय ३५ वर्षाहून अधिक नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सवलत असणार आहे.
राज्य पोलीस दलात उपनिरीक्षकांची पदे थेट सरळ सेवा, मर्यादित विभागीय व खात्यातर्गंत परीक्षा या तीन पद्धतीने भरली जातात. त्यासाठीचे प्रमाण एकूण जागांच्या अनुक्रमे ५०, २५ व २५ टक्के असे आहे. पहिल्या दोन परीक्षा या एमपीएससी मार्फत तर खात्यातर्गंत परीक्षा पोलीस महासंचालकांच्या वतीने घेतल्या जातात. पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा असूनही प्रतिकुल परिस्थिती किंवा अपुरे शिक्षण यामुळे कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेल्यांना मर्यादित विभागीय परीक्षेच्या माध्यमातून ठराविक वर्षाच्या सेवेनंतर आपल्या वर्दीवर ‘टू स्टार’ लावण्याची संधी मिळते. अधिकारी बनण्यामुळे अधिकार व वेतनामध्ये वाढ होत असल्याने त्यासाठी अनेक कॉन्स्टेबल इच्छुक असतात. त्यामुळे दर दीड दोन वर्षांने परीक्षा घेणे अपेक्षित असताना तीन वर्षापासून परीक्षा न झाल्याने इच्छुकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
आता ८२८ पदांसाठी परीक्षा
होत असून त्यामध्ये ६४२ जागा
या खुल्या प्रवर्गासाठी आहेत.
प्रत्येकी १०० गुणांची लेखी व मैदानी परीक्षा होईल. लेखी परीक्षा
२१ आॅगस्टला मुंबई, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, नाशिक, पुणे
व नागपूर या केंद्रांवर होईल.
त्यासाठी आॅनलाईन २७ जून ते ११ जुलै दरम्यान व बॅँकेद्वारे १२ जुलैपर्यत चलान भरता येईल.
>राज्य लोकसेवा आयोग राबविणार कार्यक्रम
उपनिरीक्षकांसाठी मंजूर असलेल्या पदांनुसार आणि त्यासाठी उपलब्ध कोट्यानुसार या गटातील रिक्त पदांसाठीच्या परीक्षेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. परीक्षेचा पूर्ण कार्यक्रम राज्य लोकसेवा आयोगाकडून राबविला जाईल. त्यांच्या निवडीनंतर उर्त्तीण उमेदवारांना खात्यामार्फत प्रशिक्षण दिले जाईल.
- डॉ. रवींद्र सिंघल, विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके
यापूर्वी डिपामेंटल पीएसआयची परीक्षा २०१२ व २०१३ मध्ये झाली होती. त्यासाठी अनुक्रमे ७५० व १६७ जागा होत्या. आता तीन वर्षाच्या खंडानंतर
२१ आॅगस्टला होणाऱ्या परीक्षेसाठी ८२८ जागा आहेत.

Web Title: Departmental PSI examination finally concludes 'Muhurat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.