आषाढीवारीचे प्रस्थान : लेकरांविना 'माऊली' आजोळघरी मुक्कामी; दरवर्षीपेक्षा आगळावेगळा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 08:27 PM2020-06-13T20:27:02+5:302020-06-13T20:27:50+5:30

ना फेर-फुगड्या, ना देहभान विसरून नाचणारे वारकरी..

Departure of Ashadhiwari: A different ceremony than every year, observance of government rules in Alandi | आषाढीवारीचे प्रस्थान : लेकरांविना 'माऊली' आजोळघरी मुक्कामी; दरवर्षीपेक्षा आगळावेगळा सोहळा

आषाढीवारीचे प्रस्थान : लेकरांविना 'माऊली' आजोळघरी मुक्कामी; दरवर्षीपेक्षा आगळावेगळा सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय नियमांचे पालन; माऊलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान

भानुदास पऱ्हाड -
आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८९ व्या आषाढीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटा नादाने सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तीच्या या छोटेखानी सोहळ्यात ना टाळाचा प्रचंड गजर झाला, ना पखवादाची थाप घुमघुमली. ना फेर-फुगड्या, ना देहभान विसरून नाचणारे वारकरी. दरवर्षी लाखो लेकरांसह निघणाऱ्या पालखी सोहळ्याने यंदा शासनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने मोजक्याच वारकऱ्यांच्या समवेत सायंकाळी ४.३०च्या सुमारास माऊलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले.
 

प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाल्यानंतर, प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती आणि महापूजा करण्यात आली. वीणामंडपात सकाळी दहानंतर वैष्णवमहाराज चोपदार यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.

ब्रह्मवृंदाच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. दरम्यान, शासनाने परवानगी दिलेल्या प्रस्थान संबंधित मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना पानदरवाज्यातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर मालकांनी शितोळे सरकारांना सन्मानपूर्वक मंदिरात आणले. माऊलींची आणि गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून, चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले.
 वीणामंडपातून चलपादुका बाहेर आणल्यानंतर, मंदिर आवारात मोजक्याच वारकऱ्यांच्या 'ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या' जयघोषात प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विराजमान करण्यात आल्या. त्याठिकाणी समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला.
 ..............          
माऊलींच्या १८९ व्या आषाढीवारी प्रस्थानाप्रसंगी पवमान अभिषेक, ब्रह्मवृंदाचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने 'श्रीं'ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माऊलींचे साजिरे रूप आकर्षक दिसून येत होते.

Web Title: Departure of Ashadhiwari: A different ceremony than every year, observance of government rules in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.