माऊलींच्या जयघोषात पंढरीकडे प्रस्थान
By admin | Published: July 2, 2016 02:23 AM2016-07-02T02:23:48+5:302016-07-02T12:40:52+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या शुक्रवारी (दि. १) पहाटेच नाना पेठ आणि भवानी पेठेतून हडपसरकडे मार्गस्थ झाल्या
हडपसर : संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या शुक्रवारी (दि. १) पहाटेच नाना पेठ आणि भवानी पेठेतून हडपसरकडे मार्गस्थ झाल्या. झाकोळलेल्या आभाळातून सोनेरी किरणांमध्ये वारकरी बांधव न्हावून निघाला. उन पावसाच्या खेळ सुरूच झाला नाही, त्यामुळे वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नव्हते. माऊली माऊली करीत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी ९ वाजता हडपसर गाडीतळावर दाखल झाली. त्यानंतर अकराच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली.
हडपसर गाडीतळावर महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी महापौर वैशाली बनकर, विजय वाडकर, विजया कापरे, रंजना पवार, विजय देशमुख, सुनील बनकर, प्रवीण तुपे, अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस आयुक्त कल्पना बारवकर, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ, पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या विसाव्या ठिकाण बदलल्याने भाविकांची उत्तम सोय झाली होती. पुरुष आणि महिलांची स्वतंत्र रांग तयार केली होती, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावर्षी ज्येष्ठ आणि महिलांनी समाधानाने दर्शन घेता आल्याचे सांगितले.
पुरुष मंडळी दिंडी पताका खांद्यावर घेऊन, तर तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पांडुरंगाचे नामस्मरण करीत होते. कुठे भजन, तर कुठे कीर्तन ऐकण्यात भाविक मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले होते. हडपसर आणि परिसरातील बारा वाड्यामधील नागरिक माऊलींच्या दर्शनासाठी हडपसरमद्ये दाखल होतात. सोलापूर रस्त्यावर रेसकोर्स ते लोणी काळभोर आणि हडपसर गाडीतळ ते सासवडपर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती.
लाडू, चिवडा, गोडीशेव, महिलांसाठी नकली दागिने अशा विक्रेत्यांनीही पालखी सोहळ््यात गर्दी केली होती. त्याचबरोबर वेगवेगळ््या आकाराच्या पिपाण्या, तलवार आणि ढाल असे साहित्यही विक्रीसाठी होते. अनेकांनी छोट्यांसाठी त्याची खरेदी केली. छोट्यांनी पिपाण्या वाजवून परिसर दुमदुमून टाकला होता.
विठू माऊलींच्या भेटीला निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद््गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शनाने भाविक समाधानी होत होते. काहींनी सासवड, तर काहींनी लोणीपर्यंत पालखीमध्ये सहभागी होण्याचा आनंद लुटला. (वार्ताहर)
>वारकरी जखमी
पांडुरंगाच्या भक्ताची सेवा करण्यासाठी पुणे शहर आणि उपनगरांतील नागरिकांचा प्रचंड उत्साह होता. आज एकादशीनिमित्त केळी, खिचडी, गरमगरम वाफाळता चहा देण्यात अनेकांनी धन्यता मानली. मात्र, वारकरी भक्तांनी केळी खाल्ल्यानंतर साली रस्त्यातच टाकल्या. त्यामुळे अनेक वारकरी घसरून पडले आणि काहींना मोठी दुखापतही झाली, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दरवर्षीच्या तुलनेत वारकऱ्यांची संख्या वाढली होती; मात्र फराळवाटप करणाऱ्या संस्था आणि संघटनांची संख्याही घटली होती.