राज्यात हमीभावाने तूर खरेदीचा बोजवारा
By admin | Published: February 27, 2017 12:22 PM2017-02-27T12:22:08+5:302017-02-27T12:22:08+5:30
शेतकरी चिंतीत: बारदाना आणि गोदामांची वानवा
राज्यात हमीभावाने तूर खरेदीचा बोजवारा
नारायण चव्हाण - आॅनलाईन लोकमत सोलापूर
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या तूर खरेदी केंद्रात सध्या शुकशुकाट आहे. तूर साठवण्यासाठी गोदामांची कमतरता आणि बारदान्याची टंचाई ही त्यामागची कारणे सांगितली जात आहेत. येत्या काही दिवसात हमीभावाची तूर खरेदी केंद्रे सुरु झाली नाहीत तर तूर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शासनाच्या संदिग्ध भूमिकेने चिंतीत झाला आहे. मिळेत त्या भावाने तुरीची बाजारात विक्री करण्याचा एकच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.
राज्यात नाफेडकडून हमीभावाने तूर खरेदीची केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तुरीला ५०५० रुपये हमीभाव देण्यात आल्याने बाजारात होणाऱ्या भावातील घसरणीला पर्याय मिळाला. परंतु पणन मंडळासह तूर खरेदी केंद्र चालवणाऱ्या राज्य वखार महामंडळ, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, शेतकरी उत्पादन कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून तुरीची खरेदी थांबवली आहे. त्यामुळे बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. तूर विक्रीसाठी आलेला शेतकरी चार-चार दिवस शेतमालामुळे बाजारपेठांमध्ये मुक्कामी राहत आहे.
---------------------
बारदाना टंचाई
मार्केटिंग फेडरेशनला यंदाच्या हंगामात १५ लाख क्विंटल हमीभावाने तूर खरेदी करण्याचा इष्टांक देण्यात आला होता. आतापर्यंत फेडरेशनने १३ लाख क्विंटलहून अधिक खरेदी केली आहे. याशिवाय विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने ४ लाख क्विंटल, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ३.५ लाख क्विंटल, राज्य वखार महामंडळाने ४ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. तुरीसाठी बारदान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक हमीभाव केंद्रांवर बारदाना टंचाईचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.
-----------------------
गोदामांची समस्या
खरेदी केलेल्या तुरीची पोती साठवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या गोदामांची साठवण क्षमता अपुरी पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वखार महामंडळाची गोदामे आहेत. अन्य शेतीमालासह तुरीच्या साठवणुकीने ही सर्व गोदामे तुडुंब भरली आहेत. नव्याने खरेदी सुरु केली तर हा माल साठवण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. खरेदी केंद्रांपासून ५० कि. मी. च्या अंतरावरील गोदामात होणारा वाहतूक खर्च मार्केटिंग फेडरेशनकडून केला जातो. त्यापुढील अंतरावर असलेल्या गोदामात वाहतूक करण्याचा भार कोण उचलणार हा प्रश्न पणन खात्यासमोर आहे.
--------------------
सहकारमंत्र्यांचा पाठपुरावा
कोणत्याही स्थितीत तुरीची हमीभाव केंद्रे बंद करायची नाहीत यावर राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख ठाम आहेत. खरेदी केंद्रांसंदर्भात आलेल्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी नुकतीच पणन महामंडळ, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने केवळ १५ लाख तूर खरेदीची परवानगी राज्याला दिली होती. हा इष्टांक पूर्ण झाला आहे तरीही राज्यातील खरेदी केंद्रांवर तुरीची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने वाढीव तूर खरेदीची परवानगी मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.
------------------------
बाजारभावात घसरण
शासनाचे तूर खरेदी केंद्र बंद पडल्याने व्यापारी, दाळ उत्पादक कंपन्या आणि दलालांची चांदी झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावाने तूर खरेदी करण्याचा सपाटा या मंडळींनी चालवला आहे. त्यामुळे तुरीच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. ५०५० रुपये हमीभाव असताना बाजारभाव ४२०० रुपयांपर्यंत होता. आता त्यात आणखी घट झाली असून, ३७०० ते ४ हजारांपर्यंत तो घसरला आहे.
-----------------------
तुरीच्या बारदान्याची कमतरता आहे. शिल्लक बारदाना असेल तेथे खरेदी सुरु आहे. वाढीव बारदान्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. दोन दिवसांत कलकत्त्याहून बारदाणा उपलब्ध होताच पुन्हा खरेदी केंद्रे सुरु होतील.
- डॉ. राजाराम दिघे
मुख्य कार्यकारी अधिकारी, पणन महामंडळ, पुणे