कारागृहातून पळालेल्या कैद्याची कारागृहात रवानगी

By admin | Published: September 23, 2014 01:04 AM2014-09-23T01:04:04+5:302014-09-23T01:04:04+5:30

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी महिलाविषयक कायद्याच्या विशेष न्यायाधीश कु. एस. ए. हर्णे यांच्या न्यायालयाने कारागृहातून पलायन केलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला न्यायालयीन कोठडी सुनावून

Deported prisoner to jail | कारागृहातून पळालेल्या कैद्याची कारागृहात रवानगी

कारागृहातून पळालेल्या कैद्याची कारागृहात रवानगी

Next

आता धंतोली पोलीस ताब्यात घेणार
नागपूर : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी महिलाविषयक कायद्याच्या विशेष न्यायाधीश कु. एस. ए. हर्णे यांच्या न्यायालयाने कारागृहातून पलायन केलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली.
दरम्यान कारागृहातील पलायनप्रकरणी धंतोली पोलिसांनी या कैद्याचा न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केला. या वॉरंटवर त्याला कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली जाणार आहे. सूरज श्याम अरखेल (३७) असे या कैद्याचे नाव असून, तो वर्धेच्या इतवारी बाजारनजीकच्या फुलफैल वस्तीतील स्वीपर कॉलनी येथील रहिवासी आहे.
सूरजने १७ सप्टेंबर रोजी कारागृहातून पलायन केले होते. त्यामुळे कारागृह रक्षक सदानंद ठोकळे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी या कैद्याविरुद्ध भादंविच्या २२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. १९ एप्रिल २००० पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याची खुल्या कारागृहासाठी निवड झाली होती. त्याचा गैरफायदा घेऊन शेतीच्या कामावर असतानाच त्याने पलायन केले होते.
पलायनाच्या दिवशीच सूरजने मोहननगर खलासी लाईन येथील १७ वर्षे १० महिने वय असलेल्या पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. सदर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने त्याला १९ सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर येथे अटक करून अपहृत मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली होती. त्याचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला होता. पोलीस कोठडीची मुदत संपताच त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करून त्याच्या न्यायालयीन कोठडीची विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने सूरज अरखेल याला न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. लुबेश मेश्राम आणि अ‍ॅड. अमित बंड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
अरखेलने दिली होती खुनाची धमकी
जन्मठेपेचा कैदी सूरज अरखेल याने पीडित अपहृत मुलीच्या कुटुंबाला खुनाची धमकी दिली होती, अशी माहिती प्रथम खबरी अहवालात नमूद आहे. पीडित मुलगी ही बी.ए. प्रथम वर्षाला शिकत आहे. ती आपल्या कुटुंबासह गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असताना तिच्या भावाला पोलिसांनी ८ फेब्रुवारी २०१४ रोजी भादंविच्या ३९४ कलमांतर्गत अटक केली होती. त्यानंतर १३ फेब्रुवारीपासून तो कारागृहात होता. त्याला सूरजने कारागृहातून कुटुंबाशी बोलण्यासाठी मोबाईल सेवा उपलब्ध करून दिली होती. पीडित मुलीचा भाऊ मार्चमध्ये सुटल्यानंतर सूरज हा या कुटुंबाशी मोबाईलवर सतत संपर्क साधत होता. पीडित मुलीशी तो वारंवार मोबाईलवर बोलायचा. कुटुंबाने त्याला मनाई केली असता त्याने ‘तुमच्या मुलीशी प्रेम करतो, लग्न करणार आहे’, असे सांगून टाकले होते. त्याला फोन करण्यास मनाई करण्यात आली असता त्याने खुनाची धमकी दिली होती.

Web Title: Deported prisoner to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.