पीएमसी बँकेतील ठेवीदारांची एक लाखांची रक्कम सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 07:49 PM2019-09-28T19:49:40+5:302019-09-28T19:50:18+5:30
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत.
पुणे : पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेमधे (पीएमसी) तब्बल ५१ हजार ठेवीदार-खातेदारांचे पैसे अडकले आहेत. पैसै काढण्यासाठी निर्बंध असले तरी ठेवीदांच्या १ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण असल्याने त्यांचे लाख रुपये रक्कमेपर्यंचे पैसे सुरक्षित आहेत. तसेच, अडचणीतील खातेदारांना हार्डशिप अंतर्गत आरोग्य, शिक्षण, लग्न अशा कारणांसाठी पैसे दिले जातात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. देशातील सात राज्यांमधे १३७ शाखा असून, ११ हजार ७१७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेवर ३५-अ नियमांतर्गत नियामक निर्बंध घातले आहेत. ही कारवाई पुढील सहा महिन्यांसाठी आहे. बँकेला कोणत्याही प्रकारे कर्ज नूतनीकरण करता येणार नाही. तसेच, नव्याने कर्ज देता येणार नाही. मात्र, गुंतवणूक आणि नवीन ठेवी स्वीकारण्यास निर्बंध घातले नसल्याचे बँक प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अगामी काळ सणांचा असल्याने, या काळात कर्जाला अधिक मागणी असते. कर्ज वितरणाचे निर्बंध बँकेच्या पथ्यावर पडणार आहेत.
रुपी, शिवाजीराव भोसले, लोकसेवा सहकारी आणि बीएचआर बँकेवर अलिकडच्या काळात निर्बंध निर्बंध घातल्याने अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. डिपॉझिट इन्शूरन्स अॅण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे (डीआयसीजीसी) ठेवींचा विमा उतरविला जातो. त्यानुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम संरक्षित असते. अगदी बँक दिवाळखोरीत जरी निघाली तरी तितकी रक्कम ठेवीदारांना मिळते. गेल्या पंचवीस वर्षांपासून विमा संरक्षित रक्कम तितकीच आहे. काळानुरुप त्यात ५ लाख रुपयापर्यंत वाढ करावी अशी मागणी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. ही रक्कम वाढल्यास सामान्य खातेदारांना अधिक दिलासा मिळेल.