क्षमतेनुसार जागावाटप
By admin | Published: January 18, 2017 01:43 AM2017-01-18T01:43:41+5:302017-01-18T01:43:41+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली. पहिल्या टप्प्यातील चर्चेत धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन सत्ता प्रस्तापित करण्यासाठी
प्रयत्न करण्यावर एकमत झाले. क्षमतेनुसार जागा, प्रभागानुसार चर्चाही केली जाणार आहे. पन्नास टक्के जागा मिळाव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. महापालिकेच्या सत्तेत काँग्रेस भागीदार असून, विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यात आघाडीसंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर महापालिकेच्या वर्तुळात पक्षप्रवेशाच्या अनेक घडामोडी झाल्याने चर्चा थांबली होती. स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीच्या सूचना प्रदेशपातळीवरून शहराध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग
वाघेरे यांची सोमवारी रात्री बैठक झाली. या बैठकीस दोन्ही शहराध्यक्षच उपस्थित होते.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडीस अनुकुलता दर्शविली. काँग्रेस पक्षाच्या विचारांची मतविभागणी होऊ नये, याची दखल दोन्ही पक्षांनी घ्यावी, ज्या प्रभागात ज्या पक्षाचा प्रभाव आहे, तिथे पक्षीय ताकदीनुसार जागा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच पन्नास टक्के जागा काँग्रेसला मिळाव्यात, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचेही चर्चेत पुढे आले. पहिल्या टप्प्यात आघाडीविषयी सकारात्मक चर्चा झाली. येत्या चार दिवसांत
निर्णय होणार आहे. दरम्यान प्रभागनिहाय चर्चा होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)
>महापालिका : समविचारी पक्षाशी आघाडी
महापालिका निवडणूकीसाठी पक्षश्रेष्ठींकडून सूचना मिळाल्यानंतर सोमवारी रात्री बैठक झाली. प्राथमिक चर्चा झाली. पक्षीय ताकद, प्रभाव पाहून जागा मिळाव्यात, अशी चर्चा झाली. तसेच समविचारी पक्षातील मतदानाची विभागणी होऊ नये, याबाबत आघाडी गरजेची असल्याचे दोन्ही पक्षांचे म्हणने आहे. बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे पक्षाचे निर्देश आहेत. त्यानुसार धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेसशी चर्चा सुरू झाली आहे. आघाडीबाबत आम्ही अनुकूल आहोत. प्रभागानुसार, काँग्रेसकडून कोणता प्रस्ताव येईल, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांतील मतांचा सन्मान राखण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.