अर्थसंकल्पातून सदस्यांच्या पदरी निराशा
By admin | Published: July 13, 2017 01:11 AM2017-07-13T01:11:28+5:302017-07-13T01:11:28+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्य सभेमध्ये आज २०१७-१८चा १६८ कोटी ७० लाखांचा मुळ अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषदेच्या मुख्य सभेमध्ये आज २०१७-१८चा १६८ कोटी ७० लाखांचा मुळ अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला आहे. मात्र, माजी सभागृहाने कामाचे दीडपट नियोजन केले होते. यामुळे या अर्थसंकल्पातील जवळपास शंभर कोटी पेक्षा अधिक मागचे देणे आहे. यामुळे विद्यमान सदस्यांना नियोजन करण्यासाठी फक्त ६८ कोटी ७० लाख मिळणार आहे. या अर्थसंकल्पातून जिल्हा परिषद सदस्याच्या पदरी निराशा पडली असल्याने, अनेक सदस्यांना नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून माजी सभागृहातील पदाधिकारी आणि सदस्यांना कामाचे दीड पट नियोजन केले होते. ही कामे जवळपास शंभर कोटीची होती. यामुळे मूळ अदांजपत्रकामधून जिल्हा परिषद सदस्यांना खूपच कमी निधी मिळणार आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्यांना नाराजी व्यक्त केली.
या वेळी भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील म्हणाले, की माजी सभागृहाने महिला व बाल कल्याण विभागाने सौरकंदील खरेदीसाठी ४५ लाखांची तरतूद केली होती. ही तरतुदीतून सौरदिव्यांची खरेदी करण्यात आली. मात्र, तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित न केल्याने. सौर दिव्यांचे एक वर्षापासून वाटप झाले नाही.
पांडुरंग पवार म्हणाले, की गेल्या अर्थसंकल्पामधील दहा योजनांसाठी ३९ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, यापैकी एकही रुपया खर्च झाला नाही. यामुळे या योजना रद्द करण्यात यावेत. अर्थसंकल्पामध्ये बरोजगारांना मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आर्थिक मदत यासाठी तरतूद करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली.
समाजकल्याण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभागाचा ७० टक्के निधी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आला आहे.
ठिंबक व स्प्रिंकल सिंचन योजनेअतंर्गत राज्य कृषी विभागाच्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषद अनुदान देत आहे. अपारंपरिक ऊर्जेसाठी
सौर पथदिव्याच्या नावाखाली कोट्यवधीची तरतूद केली जाते. यातले ७० टक्के सौरदिवे बंद आहेत.
शाळांच्या दरुस्तीसाठी अतिरिक्त निधी अर्थसंकल्पामध्ये द्ण्यात यावा. जलयुक्त शिवार प्रमाणे इतर जलसंधारण योजनासाठी निधी उपलब्ध करावा.
शाळामध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम राबवावी, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि सायकल द्यावे, महिलासाठी ब्युटी पार्लरचा प्रशिक्षण देण्यात यावे, अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत.
शाळा दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रणजीत शिवतरे,
प्रमोद काकडे, वीरधवल जगदाळे, अभिजीत तांबिले आणि इंदापुर सभापती करणसिंह घोलप यांनी केली.
३५ लाख खर्च करून घेतलेले ढोलताशे फुटलेले
माजी सभागृहाने ग्रामपंचयातीना पारंपरिक वाद्य पुरविण्यासाठी ३५ लाखांची तरतूद कोली होती. या तरतुदीमधून ढोलताशाची खरेदी केली होती. यामध्ये ५० टक्के ढोलताशे हवेली व शिरूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले होते.
ग्रामपंचायतीने हे ढोलताशे नेले नाहीत. यामुळे या ढोलताशांची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सूचीमध्ये ढोलताशा खरेदीचा विषय नाही.तरी फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी ढोलताशे विकत घेतले. यामुळे जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान झाले आहे. योजना लाभार्थ्यांच्या ऐवजी ठेकेदारांच्या हितासाठी राबवीत असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी केला.
>सदस्य, पदाधिकाऱ्यांकडून आणखी अभिप्राय मागवणार
शिक्षण विभागाच्या विविध योजना कागदावर असल्याची माहिती भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी सभागृहात दिली. या वेळी काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प म्हणेजे शिळ्या कढीला ऊत आहे. सर्व विद्यार्थ्यांना सायकल देण्याची गरच आहे. शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसवण्याची तरतूद यामध्ये नाही.
>मंजूर झालेले विषय
पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीवरील एक रिक्त पद भरणे, जिल्हा परिषद स्वनिधीचा अंदाजपत्रक अवलोकनार्थ मांडणे, जिल्हा ग्रामविकास निधीतून ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निदी देणे, छोटे पाटबंधारे विभागाकडील ल. पा. कामांच्या निविदांना मान्यता देणे, ३०५४ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत सन २०१७-१८ मधील मंजूर कामात बदल होणेबाबत, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लेबर बजेट व वार्षिक कृती आराखडा सन २०१७-१८चे अवलोकनार्थ सादर, ५० ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणा मार्फत करावयाची कामे, लेबर बजेट सन २०१७-१८ रक्कम लाखात करणेबाबत, ५०५४ लेखाशीर्षांतर्गत सन २०१७-१८ साठी कामांची यादी निश्चित करून देणे, जिल्हा नियोजन समिती पुणे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राकरिता औषधे, साधन व यंत्रसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत, मूळ अंदापत्रकामध्ये २२१०२९३५-३१ या लेखाशीर्ष अंतर्गत जिल्ह्याकरिता संवेदनशील आदिवासी भागातील आरोग्य सुविधा पुरविणे व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या औषध अनुदानात वाढ अंतर्गत औषध खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक साहित्य व सामग्री पुरवठा अंतर्गत खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळणे, आदिवासी योजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून थेट ओपीडी मोबाईल आभासी निदान केंद्र बसविण्यास रक्कम ५६ लाख अनुदान प्राप्त झाले असून याला मंजुरी मिळण्याबाबत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण या योजनेअंतर्गत रक्कम मिळाली असून स्थाननिश्चिती व कामनिश्चिती मान्यतेस्तव प्रस्तावित करणे, खेड तालुक्यातील शिवे येथे नवीन उपकेंद्र बांधकामास प्रशासकीय मान्यता घेणे, वेताळे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामास मान्यता घेणे, जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथे नवीन उपकेंद्र बांधकामास प्रशासकीय मान्यात मिळणे, भटकळवाडी (पिंपळवंडी) येथे नवीन उपकेंद्र बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळणे, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने वाहनचालक पुरविण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करणे, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत कंत्राटी पद्धतीने स्वच्छता सेवा पुरविण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करणे, भजनी साहित्य पुरविणे या योजनेस प्रशासकीय मान्यता देणे, सुधारित शवदाहिनी पुरविणे या योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत, व्यायामशाळा साहित्य संच पुरविणे या योजनेस प्रशासकीय मान्यता देणे, बांधकाम (दक्षिण) विभागाच्या कार्यक्षेत्रातील बी-१ निविदांना मंजुरी देणे, ५० टक्के अनुदानावर परसातील कुक्कुटपालन कार्यक्रमांतर्गत एक महिन्याचे ५० टक्के पक्षी पुरविठा करणे, पशुपालकांना ५० टक्के अनुदानावर विद्यूत चलीत कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा करणे, पशुपालकांना उपयुक्त साहित्य पुरवठा योजने अंतर्गत ५० टक्के अनुदानावर साहित्य पुरवठा करणे, मैत्रीण योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर महिलांना ५ शेळ्यांचा पुरवठा करणे, ५० टक्के अनुुदानावर पशुपालकांना मिल्कींग मशिनचा पुरवठा करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.