सिंचन योजनेपासून वंचित
By Admin | Published: May 30, 2016 01:43 AM2016-05-30T01:43:45+5:302016-05-30T01:43:45+5:30
दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे
खोर : दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्या या भागामध्ये सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे नागरिकांचे जनजवीन विस्कळीत झाले आहे. दुष्काळाच्या झळा एवढ्या तीव्र झाल्या आहेत, की पाणी अडवणुकीचे सर्वच जलस्रोत रिकामे झालेले असून, पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची मोठी फरफट होत आहे. खोर परिसरामध्ये पद्मावती, फडतरेवस्ती व डोंबेवाडी पाझर तलाव असे तीन मोठे तलाव आहेत. मात्र, हे तलाव सध्या पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. दौंडमधून बारामतीला पाणी नेण्यात येत आहे. मात्र, दौंडची जनता फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. पैसे भरले, आंदोलने केली, तरच पाणी मिळते, हाच कायदा सध्या जास्तच जोर धरून आहे. पुरंदर जलसिंचन उपसा योजना व जनाई-शिरसाई उपसा योजना या सिंचनाच्या योजना सध्या कार्यान्वित असूनदेखील दौंडकरांना याचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. वरवंड तलावातून पाणी सुप्याच्या तलावात जनाई योजनेतून सोडण्यात आले आहे. मात्र, ज्या गावांना सध्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत त्याच गावामधून योजनेची पाईपलाईन गेली आहे. त्यांना फक्त बघ्याची भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
>पैसे भरलेच नाही : पाणी देण्यास टाळाटाळ
खोर, देऊळगावगाडा परिसराला सिंचन योजनेतून पैसे न भरल्याने पाणी देण्यास टाळाटाळ होत आहे. या दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांचे दरडोई आर्थिक उत्पन्न असलेली शेतीच सध्या पडीक असल्याने संपूर्ण आर्थिक व्यवहार मंदावला गेला असल्याने सिंचन योजनेचे पाणी आणण्यासाठी पैसे भरावयाचे तरी कोठून? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. वर्षातून किमान दोन आवर्तने दौंडमधील दुष्काळी भागाला मिळणे गरजेचे आहे.
पुरंदरमधील व बारामतीमधील दुष्काळी गावांना कार्यान्वित सिंचन योजनांचे पाणी सध्याच्या कालावधीत सुटले गेले आहे. मात्र, आम्ही दौंडकरांनी केवळ पैसे भरले नाही म्हणून आम्हाला पाणी देण्यास टाळाटाळ होत आहे, अशी व्यथा खोर व देऊळगावगाडा भागामधील नागरिकांची आहे. सध्याच्या बेताल परिस्थितीमध्ये एक तरी आवर्तन द्या, अशी हाक या भागामधील जनतेची आहे.