वंचिताला न्याय देणारे अर्थचिंतन हवे - सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:08 AM2018-11-18T01:08:42+5:302018-11-18T01:10:44+5:30
मराठी अर्थ परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. येथील सरदार पटेल महाविद्यालयात सोमवारपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे. परिषदेला राज्यातून १५० अर्थशास्त्र अभ्यासक सहभागी झाले आहेत.
चंद्रपूर : देशातील वंचित, शोषित व गरजू नागरिकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल करणाऱ्या अर्थनीतीची आजही गरज आहे. गरीबांच्या घरातील अर्थकारण सुसह्य करण्यासाठी चंद्रपुरात राज्यभरातून एकत्रित आलेल्या अर्थशास्त्र अभ्यासकांनी आवश्यक बदलांवर चिंतन करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त,नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मराठी अर्थ परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. येथील सरदार पटेल महाविद्यालयात सोमवारपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे. परिषदेला राज्यातून १५० अर्थशास्त्र अभ्यासक सहभागी झाले आहेत.
मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. चारुदत्त गोखले, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष तथा अर्थशास्त्र परिषदेच्या स्वागताध्यक्ष सुधाताई पोटदुखे, सचिव प्रशांत पोटदुखे,आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार यांनी आर्थिक, सामाजिक स्वास्थ्य निर्माण होईल, अशा पद्धतीच्या अर्थशास्त्राची सध्याच्या परिस्थितीमध्ये गरज असल्याचे सांगितले. अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सरप्लस अर्थसंकल्प मांडण्याचे भाग्य मला लाभले. मात्र या सरप्लस अर्थसंकल्पाचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत का पोहचत नाही ही चिंतेची बाब आहे. यावर आम्ही अर्थशास्त्राच्या सर्व तज्ज्ञांनी विचार करावा, असेही मुनगंटीवार म्हणाले.