उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत! पंतप्रधान मोदी, अमित शाहांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:27 IST2024-12-26T17:24:45+5:302024-12-26T17:27:03+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी (२६ डिसेंबर) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

Deputy Chief Minister Eknath Shinde in Delhi! Met Prime Minister Modi, Amit Shah | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत! पंतप्रधान मोदी, अमित शाहांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत! पंतप्रधान मोदी, अमित शाहांची घेतली भेट

Eknath Shinde PM Modi: मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरूवारी दिल्लीत गेले. दिल्ली दौऱ्यात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सहकुटुंब भेट घेतली. दिल्लीत माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी या भेटीबद्दलची माहिती दिली. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे या होत्या.

पंतप्रधान मोदी, शाह यांच्या भेटीनंतर शिंदे काय बोलले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं, अनेक योजनांमध्ये केंद्राचे सहकार्य होतं. त्यामुळे अडीच वर्षात आम्ही खूप काम करू शकलो. मला याचं समाधान आहे की, अडीच वर्षात... कमी कालावधीत खूप मोठ्या काळात होईल असं काम केलं. त्याची पोचपावती आम्हाला मिळाली आणि म्हणून सदिच्छा भेट पंतप्रधान मोदीजींची घेतली. मोदीजींनी सांगितलं की, महाराष्ट्राच्या विकासात कुठेही काही कमी पडणार नाही."

कोणालाही पाठिशी घालणार नाही -एकनाथ शिंदे

सध्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "ज्या पद्धतीने ती निर्घृण हत्या झाली आहे, त्याला कधीही माफ करता येणार नाही, अशी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि मी देखील विधानसभेत सांगितले की, गुन्हेगार कितीही मोठा असला, कोणच्याही जवळचा असला, त्याचे कुठेही लागेबांधे असले, तरी कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत. महायुतीचे सरकार कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. कोणालाही पाठीशी घालणार नाही", अशी भूमिका त्यांनी मांडली.

Web Title: Deputy Chief Minister Eknath Shinde in Delhi! Met Prime Minister Modi, Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.