"अडीच वर्षांत तिघं मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढेही संपवता येणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:05 PM2022-09-22T12:05:05+5:302022-09-22T12:05:05+5:30
Maharashtra News : फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलं. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. हिंमत असेल, तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या अन् आणखीच हिंमत असेल, तर त्या सोबतच विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला.
“कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरुदन होतं. आम्ही तर कायदेशीररित्या निवडून आलो आहोत. मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा का राजीनामे दिले नाहीत किंवा का निवडणुका घेतल्या नाहीत, असा माझा सवाल आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत निवडून आला नव्हता. आमच्यासोबत निवडून आला होता. मोदींचा फोटो लावून निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी निवडून आला असता आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं होतं. कालचं भाषण हे निराशेचं भाषण होतं,” असं फडणवीस म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
“फडणवीसांची शेवटची निवडणूक असंही ते म्हणाले. तुम्ही २०१९ ला माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत आणि यापुढेही संपवू शकणार नाही,” असं म्हणत त्यांनी इशारा दिला.
कायम्हणालेहोतेउद्धवठाकरे?
“महापालिका निवडणूक आली की, या गिधाडांना मुंबई दिसते, कारण ती त्यांच्यासाठी स्क्वेअर फुटाने विकण्याची जागा आहे. आमच्यासाठी ती १०५ वीरांच्या बलिदानातून मिळविलेली मातृभूमी आहे. ती आमची आई आहे आणि या आईवर वार करायला आलेल्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,” असेही ठाकरे यांनी सुनावले.
भाजपचा उल्लेख कमळाबाई असा करून, या कमळाबाईचा मुंबईशी काय संबंध, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, “यांच्याबरोबर युतीमध्ये शिवसेनेची २५ वर्षे सडली. आमच्यासोबत वाढले आणि आम्हालाच लाथा मारू लागले. आज माझ्या घराण्यावर बोलत आहेत, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, पण भाजपवाल्यांचा वंश कोणता? इतके उपरे घेतले की, ५२ कुळे आहेत की १५२ कुळे हेच समजत नाही,” असा चिमटा त्यांनी काढला.