“जयंत पाटील यांचा अंदाज लावणे कठीण, आमचा रंग आवडेल त्यांनी सोबत यावे”: DCM एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:05 IST2025-03-14T15:00:48+5:302025-03-14T15:05:48+5:30
Deputy CM Eknath Sinde News: आमच्या विरोधी पक्षात जरी लोक कमी असले, विरोधी पक्षनेता बनण्याइतपतही संख्याबळ नसले, तरी विरोधकांना आम्ही कमी लेखत नाही, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

“जयंत पाटील यांचा अंदाज लावणे कठीण, आमचा रंग आवडेल त्यांनी सोबत यावे”: DCM एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Sinde News: गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी एका व्यासपीठावर माझी गॅरंटी घेऊ नका. माझे काही खरे नाही, असे विधान केले होते. या विधानानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील नाराज आहेत असा दावा केला. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील यांनी बारामती येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जयंत पाटील आणि खासदार शरद पवार यांच्या बराच वेळ चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटीलांची भेट घेतली होती. जयंत पाटील यांनी बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांच्यासोबत कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. उसाच्या शेतीचीही पाहणी केली. यानंतर धूलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले.
जयंत पाटील यांचा अंदाज लावणे कठीण
जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी राजकारणात काम केले आहे. जयंत पाटील यांच्या अंदाज लावणे कठीण आहे. ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. आमच्या विरोधी पक्षात जरी लोक कमी असले, विरोधी पक्षनेता बनण्याइतपतही संख्याबळ नसले, तरी विरोधकांना आम्ही कमी लेखत नाही. विरोधकांना आम्ही कमजोर समजत नाही. विरोधक आणि सत्ताधारी ही रथाची दोन चाके आहेत. बाळासाहेब नेहमी सांगायचे की, चांगल्याला चांगले म्हणा. आम्ही सरकार म्हणून चांगले काम करत असू, तर चांगले म्हणा. जिथे चुकत असेल, तिथे नक्की सूचना करा. ज्यांना कुणाला वाटेल की, या भगव्या रंगात न्हाऊन निघावे, त्यांनी सोबत यावे, अशा सगळ्यांना शुभेच्छा आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जयंत पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. राज्याच्या दौऱ्याबाबत नियोजन आम्ही केले. इतकी मोठी संघटना, इतका मोठा पक्ष असूनही त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटत आहेत. ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला.